मालदीव सरकारच्या निलंबित मंत्री मरियम शियुना यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर अखेर मरियम शियुना यांनी भारताची माफी मागितली आहे. तसेच त्यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावरुन काढून टाकली आहे. यानंतर यासंदर्भात त्यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

मरियम शियुना यांनी काय म्हटले?

“माझा उद्देश हा भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा नव्हता. तरीही मी केलेल्या पोस्टमुळे झालेला गोंधळ किंवा अपराधाबद्दल मी मनापासून माफी मागते. मी पोस्टमध्ये वापरलेली प्रतिमा भारतीय ध्वजाशी मिळतीजुळती होती. मात्र, हे पूर्ण अनावधानाने झाले असल्याचे मला स्पष्ट करायचे आहे. यापुढे भविष्यात मी जे शेअर करेल त्याबाबत मी अधिक काळजी घेईल. जेणेकरून अशा चुका टाळता येतील. तसेच मालदीव भारताबरोबरच्या नातेसंबंधाना खूप महत्व देतो. भारताचा आदर करतो”, असे मरियम शियुना यांनी म्हटले.

हेही वाचा : मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय

मरियम शियुना यांनी काय पोस्ट केली होती?

मालदीवमधील विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीला (एमडीपी) टार्गेट करण्यासाठी मरियम शियुना यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आता ती पोस्ट हटविण्यात आली आहे. मात्र, या पोस्टमध्ये पक्षाच्या चिन्हा ऐवजी भारतीय तिरंग्यात असलेले अशोक चक्र दाखवण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा दौरा केला होता. तसेच या दौऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावर मालदीवच्या काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर या टिप्पणीचे तीव्र पडसाद उमटले होते. यावरून सोशल मीडियावर ‘बायकॉट मालदीव’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. त्यामुळे मालदीवच्या पर्यटनाला मोठा आर्थिक फटका बसला होता. या घडामोडीनंतर मालदीव सरकारने भारताबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या तीन मंत्र्यांना निलंबित केले होते. यामध्ये मंत्री मरियम शियुना यांचाही सहभाग होता.