Mallikarjun Kharge on Operation Sindoor & Narendra Modi : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा ‘छोटंसं युद्ध’ असा उल्लेख केला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या संकल्प यात्रेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “गेल्या महिन्यात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांचा काश्मीर दौरा रद्द केला होता. ते स्वतः काश्मीरला गेले नाहीत. मात्र, पर्यटकांना त्यांनी पहलगामला जाऊ दिलं”.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “मला माहिती मिळाली आहे की हल्ल्याच्या तीन दिवस आधी मोदी यांना गुप्तचर यंत्रणांनी एक अहवाल दिला होता. त्यानंतर त्यांनी त्यांचा काश्मीरचा दौरा रद्द केला. या गुप्तचर अहवालात म्हटलं होतं की सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तुमचं काश्मीरला जाणं उचित नाही, तर मग तुम्ही केवळ स्वतःची सुरक्षा पाहिलीत. तुम्ही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठोसं पावलं का उचलली नाहीत. स्थानिक पोलिसांना ती माहिती का दिली नाहीत? लोकांना तिथे का जाऊ दिलंत?”
…तर पर्यटकांचा बळी गेला नसता : खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, “सरकारने पहलगाममध्ये पर्यटन स्थळी सुरक्षा पुरवली असती तर इतक्या लोकांचा बळी गेला नसता. संरक्षण यंत्रणांनी धोक्याची सूचना दिल्यामुळे मोदी स्वतः काश्मीरला गेले नाहीत. मग त्यांनी पर्यटकांनाही तिथे जाण्यापासून रोखायला हवं होतं. तुम्ही तसं केलं असतं तरी २६ लोकांचे प्राण गेले नसते”.
राहुल गांधींचा मोदी व परराष्ट्र मंत्र्यांवर हल्लाबोल
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. राहुल गांधी म्हणाले होते की “परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर स्वतः म्हणतायत की पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानला माहिती दिली होती. ही चाणक्यनिती नव्हे तर हेरगिरी आहे”. मात्र, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे”.