Mallikarjun Kharge काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी १९९९ मध्ये काय घडलं होतं आणि मुख्यमंत्रिपदाची माळ कशी गळ्यात पडली नव्हती हा किस्सा सांगितला आहे. जो चांगलाच चर्चेत आला आहे. मी सगळी मेहनत केली पण त्या मेहनतीवर बोळा फिरला आणि मी मुख्यमंत्री होता होता राहिलो असंही खरगेंनी म्हटलं आहे. विजयपूर येथील कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगेंनी हा किस्सा सांगितला जो चांगलाच चर्चेत आला आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?

“१९९९ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मी मेहनत करुन, पक्षाला विजय मिळवून दिला. त्यावेळी मला मुख्यमंत्री केलं जाईल हे जवळपास निश्चित होतं. दरम्यान हायकमांडने मला माझा हक्क दिलेला नाही. चार महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या एस. एम. कृष्णा यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं. त्या पदावर माझा हक्क होता.” असं म्हणत आपल्या मेहनतीवर कसं पाणी फेरलं गेलं हा किस्सा मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला.

मी पाच वर्षे मेहनत केली पण..

विजयपूर या ठिकाणी एका कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मी कर्नाटकात पाच वर्षे मेहनत केली आणि पक्षाला कर्नाटकात विजय मिळवून दिला. मात्र ऐनवेळी चार महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेल्या एस. एम. कृष्णा यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. या आधीही काही गोष्टी घडल्या आहेत. पण आता त्या सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही.” असं मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे.

१९९९ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते एस. एम. कृष्णा

१९९९ मध्ये कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून एस. एम. कृष्णा यांची निवड झाली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ पैकी १३२ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. मल्लिकार्जुन खरगे त्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर काँग्रेसच्या इतर सरकारांमध्येही ते मंत्री राहिले. पण मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली ती दिलीच. २००९ मध्ये खरगेंनी लोकसभा निवडणूक लढली आणि त्यानंतर त्यांना केंद्रात रोजगार मंत्री हे पद देण्यात आळं होतं. तसंच त्यांना रेल्वे मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री ही पदंही त्यांनी भुषवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मल्लिकार्जुन खरगे २०२२ मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष

मल्लिकार्जुन खरगे हे २०२२ मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. त्यावेळी त्यांच्या समोर शशी थरुर उभे होते. मल्लिकार्जुन खरगेंना ७ हजार ९८७ मतं मिळाली तर थरुर यांना १ हजार ७२ मतं मिळाली. देशभराताल्या काँग्रेसच्या ९ हजारांहून अधिक प्रतिनिधींनी १७ ऑक्टोबर २०२२ ला झालेल्या निवडणुकीत मतदान केलं. २४ वर्षात पहिल्यांदाच काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या रुपाने मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या. हे यश असलं तरी त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फारसं यश मिळवता आलं नाही.