पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये देशभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट बरीच चर्चेत आली. काँग्रेसबाबत या दोघांनी केलेल्या विधानांवरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण देखील रंगलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी टीकाकारांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जींनी इंदिरा गांधी यांचं सरकार असताना देशात आलेल्या आणीबाणीचा संदर्भ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्याशी तुलना केली आहे.

मुंबई दौऱ्यामध्ये “देशात युपीए आहेच कुठे?” असा सवाल उपस्थित केल्यामुळे काँग्रेसच्या निशाण्यावर आल्यानंतर आता ममता बॅनर्जींवर भाजपाकडून टीका होण्याची शक्यता आहे. देशातील शेतकरी आंदोलन मोदी सरकारने ज्या पद्धतीने हाताळलं, ते चुकीचं होतं, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. १९७५ साली इंदिरा गांधींचं सरकार असताना देशात आणीबाणी लागू झाली, त्यानंतर लोकांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं, तसंच उत्तर आताही जनता मोदींना देईल, असं ममता बॅनर्जींनी त्यांच्या विधानामधून सूचित केलं आहे.

“मोदींनाही जनता माफ करणार नाही”

“इंदिरा गांधी एक प्रचंड शक्तिशाली नेत्या होत्या. पण त्यावेळी त्यांनी आणीबाणी लागू केली आणि सगळं बदललं. १९७७ मध्ये त्यांनी देशाची माफी देखील मागितली. मात्र, लोकांनी त्यांना माफ केलं नाही. आपल्या पंतप्रधानांनी देखील आता शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण लोकांपर्यंत जो काही संदेश जायचा, तो गेला आहे. त्यांना देखील माफी मिळणार नाही” असं ममता बॅनर्जी मुंबईतील चर्चासत्रामध्ये म्हणाल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

“ममता दीदी थेट तर शरद पवार बिटविन द लाईन बोलणारे”, काँग्रेसविषयीच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांचा निशाणा!

“आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी कायदे कोणत्याही चर्चेविना मागे घेतले. पण त्यांनी तसं का केलं? तर उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनाही भिती आहेच. तुम्ही असं समजू नका की भाजपा पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त देशाला वाचवलं गेलं पाहिजे. काळजी करू नका, सगळ्या गोष्टी होतील”, असा सूचक इशारा देखील ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिल्व्हर ओकवर काय घडलं?

मुंबईत सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसप्रणीत युपीएवर निशाणा साधला होता. “यूपीए आहे कुठे देशात? यूपीए अस्तित्वात नाही. आम्ही सर्व समस्या सोडवू, आपल्याला एक सक्षम पर्याय हवा आहे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. त्याचवेळी शरद पवार यांनी मात्र सावध भूमिका घेत “भाजपाविरोधात जे कुणी एकत्र येतील, त्यांच्यासोबत ही नवी आघाडी असेल”, असं स्पष्ट केलं.