माध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सरकारच्या चुका दाखवण्याची महत्त्वाची जबाबदारी या स्तंभावर असते, असं मानलं जातं. माध्यमांचं हेच स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि जाहिरातदारांच्या प्रभावाखाली ते गमावलं जाऊ नये, यासाठी सरकारकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिराती दैनिकांमध्ये छापल्या जातात, जेणेकरून त्यांना उत्पन्न मिळत राहावं आणि त्यांना जाहिरातदारांवर अवलंबून राहावं लागू नये. मात्र, सरकारकडून मिळणाऱ्या याच जाहिरातींसाठी सरकारबद्दल चांगलं आणि सकारात्मक लिहिण्याची अटच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकाराला घातली आहे. भर कार्यक्रमात ममता बॅनर्जी आणि या पत्रकारामधल्या संवादाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

नेमकं झालं काय?

ममता बॅनर्जी एका कार्यक्रमात बोलत असताना एका स्थानिक वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराने त्यांना वृत्तपत्राला सरकारी जाहिराती मिळत नसल्याची तक्रार बोलून दाखवली. “आम्ही गेल्या ११ वर्षांपासून आमचं वर्तमानपत्र चालवत आहोत. पण आमच्यासोबत अनेक छोटी वर्तमानपत्र आज आर्थिक अडचणीत आहेत. आम्हाला सरकारकडून जाहिराती मिळत नाहीत. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करते की तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घालावं”, अशी विनंती या महिला पत्रकाराने ममता बॅनर्जींना केली.

सरकारचं कौतुक करणाऱ्यांना जाहिराती!

दरम्यान, या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांनी संबंधित महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तराने सर्वच जण बुचकळ्यात पडले. “ग्रामीण भागातील जी वृत्तपत्र सरकारच्या कामांविषयी चांगलं लिहितील, त्यांना जाहिरातीतून नफा मिळेल. मी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विशेषकरून सूचना देईन. कारण सरकार प्रत्येक वेळी प्रसिद्धीसाठी राज्य सरकारच्या संसाधनांचा वापर करत नाही”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी आदित्य ठाकरेंना लिफ्टपर्यंत सोडायला आल्या आणि म्हणाल्या, “तुम्ही…”; संजय राऊतांनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

“जिल्हाधिकाऱ्यांना कॉपी पाठवा”

वृत्तपत्रांनी सरकारच्या उपक्रमांविषयी केलेल्या कव्हरेजच्या कॉपी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याबाबत देखील ममता बॅनर्जींनी स्थानिक वृत्तपत्रांना बजावलं आहे. “आम्ही विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम करत असतो. मोठ्या टीव्ही चॅनल्सवर फक्त एकदाच ही बातमी दाखवली जाते. अशा उपक्रमांविषयी चांगलं लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची आम्हाला काळजी घ्यावीच लागते. त्यामुळे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तुमच्या कव्हरेजची कॉपी त्यांना पाठवा”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकाऱ्यांना कॉपी का पाठवायची?

दरम्यान, वर्तमानपत्रातील कव्हरेजच्या कॉपी जिल्हाधिकाऱ्यांना का पाठवायच्या, याविषयी देखील त्यांनी तात्काळ खुलासा केला आहे. “बातम्यांच्या कॉपी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळे त्यांना हे पाहाता येईल की सरकारबद्दलचं कव्हरेज सकारात्मक आहे की नकारात्मक. जे कुणी सकारात्मक कव्हरेज जास्त करत असेल, त्यांना जाहिराती मिळतील. त्यांनी चांगलं काम करावं आणि सर्व सकारात्मक बाबींवर भर द्यवा असं मला वाटतं”, असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.