Gujarat High Court Viral Video : देशभरातील अनेक न्यायालयांमध्ये ऑनलाइन सुनावण्या घेतल्या जात आहेत. मात्र, बऱ्याचदा काही लोक कॅमेऱ्यासमोर विचित्र हालचाली व हावभाव करून न्यायालयाच्या कामात व्यत्यय आणत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशीच एक घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. कारण सुनावणीवेळी पक्षकार कमोडवर (टॉयलेट सीट) बसला होता.

गुजरात उच्च न्यायालयात चालू असलेल्या एका खटल्याची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केली जात होती. ही सुनावणी चालू असताना एक तरुण शौचालयातील कमोडवर बसल्याचं दिसत होता. बार अँड बेन्चने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की ही २० जून रोजी घडलेली घटना आहे. न्यायमूर्ती निरजर एस. देसाई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी चालू असताना ही घटना घडली आहे.

तरुणाचं व्हिडीओ कॉलमध्ये आक्षेपार्ह कृत्य

समद बॅटरी नावाने या व्हिडीओ कॉलमध्ये लॉग इन केलेली एक व्यक्ती दिसत आहे. त्याने गळ्यात ब्लुटूथ इयरफोन अडकवले आहेत. सुनावणी चालू असताना त्याने फोन थोडा दूर नेला. त्यामुळे तो टॉयलेट सीटवर बसून शौच करत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर तो टॉयलेटमधून बाहेर पडला. काही वेळ तो कॅमेऱ्यापासून दूर गेला. काही वेळाने तो परत आला आणि सुनावणी ऐकू लागला.

गुजरात उच्च न्यालयाच्या नोंदीनुसार या तरुणाने त्याच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. २० जून रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्यपूर्ण तोडगा निघाल्यानंतर गुन्हा रद्द केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाच्या ऑनलाइन कार्यवाहीदरम्यान अशा प्रकारे अनुचित व्यवहार झाल्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी एप्रिल महिन्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर असलेला इसम कॅमेऱ्यासमोर सिगारेट ओढताना दिसला होता. गुजरात न्यायालयाने त्याला ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला होता. याआधी दिल्लीतील एका न्यायालयात चालू असलेल्या खटल्यावेळी जामिनावर असलेला आरोपी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायमूर्तींसमोर हजर झाला होता. मात्र, सुनावणी चालू असताना तो सिगारेट ओढत असल्याचं पाहायला मिळालं. न्यायमूर्तींनी त्याला कठोर शब्दांत सुनावल्यानंतर त्याने माफी मागितली.