एखाद्या गुन्ह्याचा तपास सुरू झाला, की तो नेमका कधी संपेल आणि त्यात संबंधित गुन्हेगाराला कधी शिक्षा होईल, याविषयी अंदाज बांधणं कठीण असतं. केरळमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं असून एका महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी तब्बल १७ वर्षांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या पतीनंच तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. त्यामुळे पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे!
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण आहे २००६ सालातलं. ५० वर्षीय रमादेवी यांची केरळच्या पुल्लड गावातील राहत्या घरी हत्या झाली. या महिलेचा पती जनार्दनन यानं दिलेल्या तक्रारीनुसार, आपल्या पत्नीचा मृतदेह आपणच सर्वात आधी पाहिल्याचा दावा जनार्दननं केला होता. घर आतून बंद होतं. त्यामुळे घरात जाण्यासाठी दाराच्या वरच्या खिडकीचा वापर करून आपण आत शिरल्याचंही जनार्दननं सांगितलं. गुन्हेगारानं रमादेवीची हत्या करून दरवाजा आतून बंद होईल या पद्धतीने तो लोटून निघून गेला असावा, असा अंदाज जनार्दननने तक्रारीत व्यक्त केला होता.
‘त्या’ स्थलांतरितावर संशय!
आसपासच्या लोकांच्या मते हत्येच्या आठवडाभर आधीच त्या भागात बांधाकामाच्या रोजंदारीसाठी तामिळनाडूहून एक मजूर जोडपं राहायला आलं होतं. त्यातील पुरुषाला हत्येच्या दिवशी आसपासच्या लोकांनी जनार्दननच्या घराजवळ पाहिलं होतं. पण हत्या झाली असून त्याचा संशय आपल्यावर येतोय असं वाटताच या व्यक्तीने त्याच्या पत्नीसह तिथून पळ काढल्याचा दावा आसपासच्या लोकांनी केला. त्यामुळे साहजिकच पोलिसांनी हत्येचा मुख्य आरोपी म्हणून त्याचंच नाव निश्चित केलं.
हत्येच्या घटनेनंतर पुढील तीन वर्षं पोलीस संशयिताचा शोध घेत होते. मात्र, त्यांना त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. यादरम्यान, २००७ साली जनार्दननने पोलिसांचा संशय आपल्यावर येऊ नये, म्हणून केरळ उच्च न्यायालयात प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी याचिका दाखल केली. पण ही मागणी मान्य झाली नव्हती.
पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला!
दरम्यान, इतकी वर्षं मुख्य आरोपी न सापडल्यामुळे पोलिसांचा तपास खोळंबला होता. मात्र, गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून पोलिसांनी पुन्हा एकदा नव्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. संशयाची सुई जनार्दननवर जात असल्याचं पाहून पोलिसांनी घटनास्थळी तेव्हा गोळा केलेल्या पुराव्यांची पुन्हा तपासणी केली. रमादेवीच्या हातात तेव्हा काही केस आढळून आले होते. मात्र, मुख्य आरोपीच फरार असल्यामुळे पोलिसांनी ते इतर कुणाशीही जुळवून पाहिले नव्हते. आता मात्र पोलिसांनी ते जनार्दननच्या डीएनएशी जुळवून पाहिले आणि पोलिसांना धक्का बसला!
मृत महिला रमादेवीच्या हातात सापडलेल्या केसांचा डीएनए व पती जनार्दननचा डीएनए एकसारखाच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता हे प्रकरण उलगडत गेलं. जनार्दनन व रमादेवी यांच्यात वारंवार वाद व्हायचे. त्या दिवशी या वादाचंच पर्यवसान जनार्दननं रमादेवीची हत्या करण्यात झालं असावं, असा कयास पोलिसांनी लावला. तसेच, जनार्दननने पोलीस तपासात दिलेल्या कबुलीजबाबात प्रचंड विसंगती आढळून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनार्दननला असं वाटत नक्कीच होतं की कधीतरी तो पकडला जाईल. मात्र, त्यानं असा अजिबात कयास लावला नव्हता, की इतक्या वर्षांनंतर त्याला अटक होईल!