सुमित अग्रवाल नावाच्या एका कंपन्यांना सल्ला देणाऱ्या सल्लागाराने LinkedIn वर दिवाळीच्या निमित्ताने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला आलेला अनुभव त्याने सांगितला आहे. मी आणि माझं कुटुंब दिवाळीच्या निमित्ताने कसं भावनिक गुंतागुंतीतून गेलो हे सुमित अग्रवाल यांनी पोस्ट करुन सांगितलं आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
नेमकं काय घडलं?
सुमित अग्रवाल हे पश्चिम बंगालच्या बिधाननगर भागात राहतात. त्यांनी रंग दे बसंती ढाबा या ठिकाणाहून दिवाळी असल्याने शाकाहारी जेवण ऑर्डर केलं होतं. मात्र त्यांना शाकाहारी जेवणाच्या ऐवजी चिकन तंदुरी पार्सल म्हणून पोहचवण्यात आलं. यामुळे सुमित अग्रवाल यांना तर धक्का बसलाच पण त्यांच्या आईलाही या गोष्टीचा धक्का बसला. दिवाळीच्या दिवशी घरात चिकन आल्याने त्यांना भावनिक दृष्ट्या खूपच त्रास झाला. मी एका मारवाडी कुटुंबाचा सदस्य आहे. मी मटर मशरुम ऑर्डर केलं होतं पण त्याऐवजी आम्हाला स्विगीच्या माणसाने तंदुरी चिकन आणून दिलं. आमच्यासाठी हा फक्त एक घोळ किंवा डिलिव्हरी करताना झालेली चूक नाही. आमच्या भावना यामुळे दुखावल्या आहेत असं अग्रवाल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. घडल्या प्रकारानंतर रंग दे बसंती या रेस्तराँने सुमित अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.
माझ्या आईने चिकन पाहिलं आणि तिला धक्काच बसला-सुमित अग्रवाल
सुमित अग्रवाल त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले, माझी आई शुद्ध शाकाहारी आहे. दिवाळीच्या पूजेच्या दिवशी आम्ही जेवण उघडलं तेव्हा त्यात चिकन होतं. हे पाहून तिला धक्का बसला. पूजा झाल्यानंतर जेवणाचं पार्सल उघडलं आणि ते चिकन होतं हे पाहून तिला खूपच वाईट वाटलं आणि धक्का बसला. त्यानंतर ती शांतच बसली. असं सुमित त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
तुम्ही लोकांच्या भावनांशी कसे काय खेळू शकता?
अग्रवाल पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या चुका डिलिव्हरी करताना होऊ शकतात हे मला मान्य आहे. पण आता एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या तर काय करायचं? माझी आई अजिबात नॉनव्हेज खात नाही त्याकडे बघतही नाही. तिला दिवाळी पूजेनंतर नॉन व्हेज पहावं लागलं याचा तिला प्रचंड त्रास झाला आहे. लोकांच्या संस्कृतीचा, त्यांच्या भावनांचा विचार रेस्तराँ आणि स्विगीसारखे डिलिव्हरी पार्टनर्स करणार आहेत की नाही? असाही प्रश्न सुमित अग्रवाल यांनी विचारला.
रेस्तराँने व्यक्त केली दिलगिरी
दरम्यान सुमित यांच्या पोस्टनंतर रंग दे बसंती रेस्तराँने माफी मागितली आहे. सुमित तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जो अनुभव आला ज्यातून जावं लागलं ते आम्ही समजू शकतो. तुम्हाला भावनिक दृष्ट्या काय वाटत असेल याची कल्पना आली आहे. आम्ही त्याबाबत दिलगीर आहोत. स्विगीकडेही आम्ही हे प्रकरण नेलं आहे. त्यांच्याकडूनही अशी चूक पुन्हा होणार नाही. घडलेल्या प्रकाराबाबत आणि तुमच्या भावना दुखावल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत असं रेस्तराँने म्हटलं आहे.