आपल्या गरोदर पत्नीचा व होणा-या बाळाचा जीव वाचवण्यासाठी एक तरूण मुसळधार पावसामध्ये जंगल तुडवत तब्बल ४० किलोमीटर चालून रूग्णालयात दाखल झाला. मात्र, त्यांच्या बाळाचे प्राण वाचवण्यात त्याला यश आले नाही.
केरळमधील कोन्नीच्या जंगलात राहणारा आदिवासी युवक आयप्पनला आपली सात महिन्यांच्या गरोदर पत्नीला रूग्णालयात दाखल करण्यासाठी तब्बल  ४० किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागला. त्याने गुरूवारी सकाळी ६ वाजता पत्नी सुधाला खांद्यावर घेऊन चालायला सुरूवात केली. आयप्पनच्या जंगलातील घरापासून ४० किमी अंतरावर असलेल्या कोक्काथोडमध्ये पोहचल्यावर त्याला पुढील प्रवासाठी वाहन उपलव्ध झाले. मात्र, त्याला खूप उशीर झाला होता. कोट्ट्याम वैद्यकीय महाविद्यालयात सुधाला दाखल करण्यात आले तेव्हा तिची प्रकृती चिंताजनक होती.
“तिचा रक्तदाब प्रचंड वाढला होता व जलशोफामुळे ती अशक्त झाली होती. अशा अवस्थेस प्रसूती करणे अवघड असते. सुधाच्या प्रसूतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. सुधाला ४० किलोमीटरचे अंतर खांद्यावर बसूनच पार पाडावे लागल्यामुळे अर्भक गर्भातच दगावले होते. मात्र, सुधाची प्रकृती स्थिर आहे.”, असे सुधावर उपचार करणा-या कोट्ट्याम वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. कुंजम्मा रॉय यांनी सांगितले.
आयप्पन आणि सुधा कोन्नीच्या जंगलात मध व जंगलातील वनौषधी गोळाकरून त्याच्यावर आपला चरितार्थ चालवतात. माध्यमांनी या घटनेला प्रसिध्दी दिल्यानंतर आयप्पन आणि सुधासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.