कर्नाटकमधील मंगळुरू येथे १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रेशर कुकर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सुरु आहे. आज ईडीच्यावतीने मंगळुरू ब्लास्ट प्रकरणात कर्नाटकात पाच ठिकाणी छापेमारी केली. या स्फोटाचा मुख्य आरोपी शिवमोग्गा येथील आरोपी शारिकच्या घरीही ईडीची तापसणी सुरु आहे. तसेच शारिकच्या नातेवाईकांकडेही तपासणी केली जात आहे. तसेच काँग्रेस नेते किम्मने रथ्नाकर यांचीही चौकशी यानिमित्ताने केली जात आहे. शारिकच्या वडीलांसोबत व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर असून त्याबाबत पुढील तपास सुरु आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी तीर्थहल्ली परिसरातील एका शॉपिंग सेंटरवर छापा मारला आहे. हे सेंटर शारिकच्या वडीलांचे असल्याचे सांगितले जाते. याच सेंटरच्या इमारतीमध्ये काँग्रेस पक्षाने भाड्याने कार्यालय घेतलेलं आहे. या भाडेकरारावर शारिकचे वडील आणि काँग्रेस नेते किम्मने रथ्नाकर यांचा पुतणा नवीन याची स्वाक्षरी आहे. हा भाडेकरार जून २०२३ रोजी संपणार असून याच्याभाड्यापोटी शारिकच्या वडिलांना महिन्याला दहा हजार रुपये दिले जातात.
हे ही वाचा >> Mangaluru Blast : आरोपी मोहम्मद शरीक झाकीर नाईक कनेक्शन? मोबाईलमध्ये सापडली धक्कादायक माहिती
या प्रकरणात तपास यंत्रणांनी जलदगतीने चौकशी करत अनेक लोकांना अटक केली आहे. एनआयएने ५ जानेवारी रोजी कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते तजुद्दीन शेखचा मुलगा रेशान याला ISIS सोबत संबंध असल्याचा आरोप ठेवत अटक केलीहोती. शिवमोग्गा स्फोटाशी निगडीत कन्नड, शिवमोग्गा, दावणगेरे आणि बंगळुरु जिल्ह्यात विविध ठिकाणी NIA ने याआधीच छापेमारी केली आहे. १९ नोव्हेंबर रोजी स्फोट झाल्यानंतर NIA ने मंगळुरू येथील एका मॅकेनिकल इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं होतं. महाविद्यालयाने यावर प्रतिक्रिया दिली की, संबंधित विद्यार्थी हा स्फोटातील मुख्य आरोपी मोहम्मद शारिक याचा निकटवर्तीय होता.
विद्यार्थ्यांना दिले जाते बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण
प्रेशर कुकर स्फोटाचा तपास सुरु असताना पोलिसांना तपासात अनेक धक्कादायक बाबी समजल्या. भारताबाहेरील लोक विद्यार्थ्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देतात, तसेच त्यासाठी काही दस्तऐवज देखील पुरवितात. याच आधारे आरोपींनी बॉम्ब तयार केला आणि शिवमोगा जिल्ह्यातील तुंगा नदीच्या किनारी याचे परिक्षण केले गेले. आरोपींना कर्नाटकातील वातावरण दूषित करायचे होते, असाही दावा पोलिसांनी केला आहे.