देशाच्या काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या गुप्तचरांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड केली असल्याचा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात शुक्रवारी चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान, काँग्रेसने पर्रिकर यांच्या या दाव्यास जोरदार आक्षेप घेतला असून पर्रिकर यांनी आपल्या विधानाचे पुरावेच सादर करावेत किंवा जाहीररीत्या माफी मागावी, असे आव्हान दिले आहे.
पर्रिकर यांनी माजी पंतप्रधानांचा नामोल्लेख करण्याचे टाळले असून त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
नववर्षांच्या प्रारंभी तटरक्षक दलाने पोरबंदरजवळ पाकिस्तानी बोटीवर केलेल्या कारवाईच्या संदर्भात मुंबईत बोलताना पर्रिकर यांनी हे मतप्रदर्शन केले. कोणत्याही संरक्षण सज्जतेची विश्वासार्हता निर्माण करताना दोन ते तीन दशकेही लागू शकतात. परंतु ती धोक्यात यायला वेळ लागत नाही, असा दावा करून पर्रिकर यांनी तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईचा विस्तृत तपशील देण्याचे टाळले होते. या प्रकरणी माहितीचे स्रोत आपण उघड करू शकत नाही, असेही पर्रिकर यांनी स्पष्ट केले होते.
मात्र, याच ओघात बोलताना काही पंतप्रधानांनी देशाच्या गुप्तचरांसंदर्भात सुरक्षेशी तडजोड केल्याचा दावा केला आणि वादाची ठिणगी पडली. या पंतप्रधानांची नावे मी जाहीर करणार नाही, लोकांना ही नावे ठाऊक आहेत, असेही पर्रिकर यांनी सूचित केले.
काँग्रेसची टीका
हे आरोप गंभीर असून पर्रिकर यांनी पुरावे द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. लोकांपुढे या प्रकरणी सत्य आलेच पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इतर भाजप नेत्यांप्रमाणे आरोप करायचे नंतर माघार घ्यायची, असे प्रकार पर्रिकर करणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी पंतप्रधान मग ते कोणत्याही पक्षाचे असू दे, त्यांचा अवमान सहन कसा करणार, असा सवाल काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी उपस्थित
केला.
भाजपकडून बचाव
भाजपने मात्र पर्रिकरांचे समर्थन केले आहे. पर्रिकर हे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे त्याचा तपशील येण्यासाठी धीर धरा, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल.नरसिंह राव यांनी केला आहे. काँग्रेसच्या काही माजी पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली, हे उघड असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2015 रोजी प्रकाशित
काही माजी पंतप्रधानांकडून देशाच्या सुरक्षेशी तडजोड
देशाच्या काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या गुप्तचरांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड केली असल्याचा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात शुक्रवारी चांगलीच खळबळ उडाली.
First published on: 24-01-2015 at 01:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar parrikar says some ex pms compromised indias deep assets congress demands evidence