Kolkata Hotel Fire: कोलकातामधील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक गजबजलेल्या परिसरातील सहा मजली हॉटेलला मंगळवारी सायंकाळी आग लागली. या आगीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. यापैकी अनेकांचा मृत्यू गुदमरून झाला तर एक व्यक्ती आगीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना इमारतीवरून खाली पडला.

कोलकाताच्या बुर्राबाजार परिसरातील मदनमोहन रस्त्यावरील ऋतुराज हॉटेलमध्ये सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाकडून दहा बंब घटनास्थळी बचाव कार्य करत होते. रात्री १ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

कोलकाता पोलिसांनी सांगितले की, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी विशेष चौकशी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आग भडकल्यानंतर अनेक लोक हॉटेलच्या आत अडकले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यावसायिक गोदामाच्या वर ऋतुराज हॉटेलचे बांधकाम करण्यात आलेले आहे. तळमजल्यावर गोदाम असून त्यावर पाच मजली हॉटेल आहे.

आग भडकल्यानंतर जिने आणि मजल्यावरील मोकळ्या परिसरात धुराचे लोट पसरले. आगीपासून सुरक्षित राहण्यासाठी हॉटेलमधील काही लोक गच्चीवर गेले. काहींनी खिडक्यांवर असणाऱ्या अरुंद कट्ट्याचा आधार घेतला. कट्ट्यावर उभ्या असलेल्या लोकांना सुरक्षित खाली आणण्यासाठी अग्निशमन दलाने हायड्रॉलिक शिडीचा वापर केला. तसेच गच्चीवर असलेल्या लोकांनी आपल्या मोबाइल टॉर्चरचा वापर करत मदत मागितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर कोलकाता मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय पासवान नावाच्या व्यक्तीला काल रात्री रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित करण्यात आले. आगीतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी त्यांनी इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच आग संपूर्ण विझळ्यानंतर बुधवारी (३० एप्रिल) सकाळी अग्नीशमन दलाने शोध घेतला असता १४ जणांचे मृतदेह आढळून आले.