Nobel Peace Prize winner 2025 Maria Corina Machado Mahatma Gandhi Influence: नोबेल पुरस्कार समितीने यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर केला आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यापासून जगभरात त्यांची चर्चा होऊ लागली आहे. अशात, आता त्यांनी २०१० मध्ये केलेल्या काही एक्स पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या प्रसिद्ध वाक्यांचा उल्लेख केला आहे. या व्हायरल होणाऱ्या पोस्ट्समुळे मारिया कोरिना मचाडो यांच्यावरही महात्मा गांधींचा प्रभाव असल्याचे सोशल मीडिया युजर्स म्हणत आहेत.
नोबेल विजेत्या मचाडो यांनी मे २०१० मध्ये एक्सवरील एका पोस्टमध्ये, स्पॅनिशमध्ये लिहिले होते की, “तुम्ही जे काही कराल ते क्षुल्लक असेल, परंतु ते करणे खूप महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी.”
मे २०१० मध्येच केलेल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये मचाडो म्हणाल्या होत्या की, “जर शांतता आपल्या अस्तित्वाचा नियम असेल, तर भविष्य स्त्रीचे आहे. गांधी.”
आणखी एका पोस्टमध्ये मचाडो यांनी असे लिहिले आहे की, “अन्याय्य कायदे पाळणे त्यांच्या मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे, हे जेव्हा एखाद्याला समजते, तेव्हा कोणताही अत्याचार त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही. गांधी.”
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून महात्मा गांधींनी शांततेच्या मार्गाने ब्रिटीशांविरोधात मोठा लढा दिला होता. त्यामुळे त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी १९३७, १९३८, १९३९, १९४७ आणि १९४८ मध्ये नामांकन मिळाले होते. मात्र, त्यांना हा पुरस्कार एकदाही मिळाला नाही.

कोण आहेत मारिया मचाडो?
२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. मचाडो यांनी त्यांच्या देशात लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे. मारिया कोरिना यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांचे वडील हेन्रिक मचाडो हे एक उद्योगपती होते आणि तिची आई कोरिना पॅरिस्का या मानसशास्त्रज्ञ होत्या.
व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी
लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामासाठी व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांचे नाव टाईम मासिकाच्या ‘२०२५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तीं’च्या यादीतही आहे.
२०२५च्या शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्याची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटले आहे की, “व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.”