Maria Corina Machado Nobel Peace Prize Controversy: व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. अनेक टीकाकारांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, मारिया कोरिना मचाडो यांनी इस्रायलने गाझावर केलेल्या बॉम्बहल्ल्यांना पाठिंबा दिला होता. तसेच, त्यांनी आपल्या देशातील सरकार उलथवून टाकण्यासाठी परदेशी हस्तक्षेपाचे आवाहनदेखील केले होते.
मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलाच्या लोकशाही समर्थक चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती आहेत. व्हेनेझुएलामध्ये लोकशाहीला चालना देण्यासाठी आणि हुकूमशाहीशी लढण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल नोबेल पारितोषिक समितीने काल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार विजेते म्हणून घोषित केले आहे.
जगभरातील आठ युद्धे शांततेच्या मार्गाने थांबवल्याचा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने या पुरस्कारासाठी आपण योग्य व्यक्ती असल्याचे म्हणत होते. पण, नोबेल पारितोषिक समितीने त्यांना डावलल्यानंतर काही तासांतच व्हाइट हाऊसकडून यावर टीका करण्यात आली आणि म्हटले की, “शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य देण्यात आले आहे.”
गाझामधील “नरसंहाराला” पाठिंबा दिल्याबद्दल लक्ष्य करण्यासाठी टीकाकार मचाडो यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल करत आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यानंतर त्यांनी निषेध नोंदवला होता. पण, त्यांनी कधीही पॅलेस्टिनींच्या हत्येला पाठिंबा दिला नव्हता.
पण, गेल्या काही वर्षांमध्ये मचाडो यांच्या पोस्टवरून त्यांचे आणि नेतन्याहू यांचे चांगले संबंध असल्याचे दिसून येते. त्यांच्या टीकाकारांनी ज्या पोस्टवर टीका केली होती, त्यात मचाडो यांनी म्हटले होते की, “व्हेनेझुएलाचा संघर्ष हा इस्रायलचा संघर्ष आहे.” दोन वर्षांनंतर, त्यांनी इस्रायलला “स्वातंत्र्याचा खरा मित्र” म्हटले होते. याचबरोबर, जर त्या सत्तेत आल्या, तर व्हेनेझुएलाचा दूतावास तेल अवीवहून जेरुसलेममध्ये हलवण्याचे आश्वासनही मचाडो यांनी दिले होते.
नॉर्वेचे राजकीय नेते ब्योर्नार मोक्सनेस यांनी निदर्शनास आणून दिले की, मचाडो यांनी २०२० मध्ये इस्रायलच्या लिकूड पक्षासोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी केली होती. लिकूड पक्ष “गाझा नरसंहारासाठी” जबाबदार आहे आणि म्हणूनच हा पुरस्कार नोबेलच्या उद्देशाशी सुसंगत नाही, असे ते म्हणाले.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या राजवटीविरुद्धच्या प्रचारात परदेशी हस्तक्षेपाचे आवाहन केल्याबद्दलही मचाडो यांना टीका सहन करावी लागत आहे. २०१८ मध्ये, त्यांनी आपल्या देशातील राजवट बदलण्यासाठी इस्रायल आणि अर्जेंटिनाकडून पाठिंबा मागणारे पत्र लिहिले होते.