सुरिन (थायलंड) : कंबोडियाशी वाढत असलेल्या संघर्षादरम्यान थायलंडने आठ सीमावर्ती प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. नागरिकांना प्रवास टाळण्याचा, सतर्क राहण्याचा आणि संघर्ष वाढत असताना अधिकृत सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले.
कंबोडियाशी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी तिसऱ्या देशांनी केलेल्या मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळून लावला. न्होम पेन्हने हल्ले थांबवावेत आणि द्विपक्षीय चर्चेद्वारे तोडगा काढावा, असे थायलंडने म्हटले आहे. अमेरिका, चीन आणि मलेशिया, जे आसियान प्रादेशिक गटाचे सध्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला आहे, तथापि बँकॉकला संघर्षावर द्विपक्षीय तोडगा हवा असल्याचे थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते निकोर्नडेज म्हणाले.
गुरुवारी पहाटे एका प्राचीन मंदिराशेजारील वादग्रस्त भागात दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला, जो वादग्रस्त सीमेवरील इतर भागातही पसरला आणि सलग दुसऱ्या दिवशी जोरदार चकमक झाली. दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.दरम्यान, थायलंड आणि कंबोडियामधील लष्करी चकमकींमध्ये वाढ झाल्यास युद्धाची शक्यता असल्याचे मत थायलंडचे काळजीवाहू पंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनी सांगितले.
सीमेवरील चकमकीत १४ ठार थायलंड आणि कंबोडियाच्या सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या चकमकीत कमीत कमी १४ जणांचा मृत्यू झाला यात अधिकांश नागरिकांचा समावेश आहे. या वेळी दोन्ही बाजूंकडून लहान शस्त्रे, तोफा आणि रॉकेटचा मारा करण्यात आला. या वेळी थायलंडने कंबोडियावर हवाई हल्लेदेखील केले.
थायंलडच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सुरसंत कोंगसिरी यांनी गुरुवारी दोन भागांत चकमक झाल्याची माहिती दिली. या घटनेपूर्वी सीमेवरील भूसुरुंग स्फोटात थायलंडचे पाच सैनिक जखमी झाले होते. या संघर्षानंतर थायलंडने कंबोडियातील आपल्या राजदूताला माघारी बोलावले होते तर थायलंडमधील कंबोडियाच्या राजदूताची हकालपट्टी केली होती.ओड्डार मीन्चे प्रांतातील कंबोडियाचे मुख्य अधिकारी जनरल खौव ली यांनी प्राचीन ता मुएन थॉम मंदिराजवळ पहाटे संघर्ष सुरू झाला, अशी माहिती दिली.