Masood Azhar Jaish-e-Mohammed womens Wing : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आता महिलांना देखील दहशतवादी कारवायांसाठी तयार करत आहेत. ‘जैश’चा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्या भाषणाचा २१ मिनिटांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमधील बहावलपूरमध्ये त्याने नुकतंच भाषण केलं. यामध्ये अजहरने जैशच्या महिला शाखेची घोषणा केली आहे. ‘जमात-उल-मोमिनात’ या योजनेअंतर्गत जैशने महिलांची दहशतवादी टोळी बनवण्याचा कट रचला आहे.
मसूद अजहरच्या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण दिलं जाईल, त्यांचं ब्रेनवॉशिंग करणे आणि त्यांचा दहशतवादी कारवाया व युद्धात वापर करण्यासाठीची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
महिलांसाठी ‘दौरा-ए-तस्किया’ हा कोर्स सुरू करणार : अजहर
अजहरने म्हटलं आहे की “संघटनेत दाखल झालेल्या तरुणांना १५ दिवसांचा ‘दौरा-ए-तरबियत’ हा कोर्स पूर्ण करावा लागतो. यामध्ये त्यांना भारताविरोधातील जिहादसाठी तयार केलं जातं, त्यांचं ब्रेनवॉश केलं जातं. आता महिलांसाठी ‘दौरा-ए-तस्किया’ हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. बहावलपूरमधील मर्कजमध्ये महिलांना प्रशिक्षण दिलं जाईल.”
जन्नतचं अमिष दाखवून पुरुषांप्रमाणे महिलांना जिहादसाठी तयार करण्याची अजहरची योजना
जैशच्या म्होरक्याने म्हटलं आहे की “जी महिला या संघटनेत दाखल होईल ती मृत्यूनंतर थेट स्वर्गात जाईल. या योजनेअंतर्गत पहिला कोर्स पूर्ण केल्यानंतर ‘दौरा-आयत-उल-निसाह’ हा दुसरा टप्पा पार करावा लागेल. यामध्ये महिलांना इस्लामी पुस्तकं दिली जातील. कट्टर इस्लामी शिक्षण दिलं जाईल. महिला जिहाद कसा करू शकतील हे त्यांना शिकवलं जाईल. मागील २० वर्षांपासून पुरुषांना जन्नतचं (स्वर्ग) अमिष दाखवून संघटनेत सामील करून घेता आलं आता महिलांना देखील तेच शिकवलं जाईल.”
महिला ब्रिगेड जगभरात इस्लाम पसरवणार : अजहर
अजहरने तर्क मांडला की “जैशच्या शत्रूंनी हिंदू महिलांना सैन्यात सहभागी करून घेतलं आहे. महिला पत्रकारांना आपल्याविरोधात उभं केलं आहे. त्यामुळे आता आपणही आपल्या महिलांना तयार केलं पाहिजे. जैश आता महिलांची फौज उभी करत आहे. आपली महिलांची फौज त्यांच्या महिलांविरोधात लढेल. जैशचे पुरुष मुजाहिदीन या महिलांबरोबर उभे राहतील. ही ब्रिगेड जगभरात इस्लाम पसरवण्याचं काम करेल.”
