Massive fire near Charminar in Hyderabad: हैदराबादच्या चारमिनार परिसरातील गुलजार हाऊस इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ५.३० वाजता चारमिनारजवळील एका दागिन्याच्या दुकानात आग लागली. तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे दुकान आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ११ गाड्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांसाठी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, तेलंगातील हैदराबाद येथे आग लागून मोठी जीवितहानी झाली, त्याबद्दल मनापासून दुःख झाले. ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. तळमजल्यावरील दुकानात आग लागल्यानंतर काही वेळेतच त्याचा धुर वरच्या मजल्यावर गेला. ज्यामुळे तेथील रहिवाशी गुदमरले गेले.
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली. ते म्हणाले, तळमजल्यावर एका कुटुंबाच्या मालकीचे दागिण्यांचे दुकान होते. तर हे कुटुंब वरच्या मजल्यावर राहत होते. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी आहेत. या घटनेबद्दल मला कुणालाही दोष द्यायचा नाही. परंतु हैदराबाद शहर हे वेगाने विकसित होत असल्यामुळे आता पोलीस, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि वीज विभागालाही स्वतःमध्ये बदल करावे लागतील.