उत्तर प्रदेशात २०१३ पासून ते आजवर दंगलीच्या २४७ घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक दंगलीच्या घटनांसह हे राज्य देशात आघाडीवर आहे.
मुजफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीनतर निदान आता तरी या भागात शांतता नांदेल, अशी अपेक्षा नागरिकांनी केली होती; परंतु यंदाही या परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात झालेल्या जातीय दंगलीमध्ये ७७ जणांचा बळी गेला होता. या वर्षीचा निश्चित आकडा अद्याप केंद्रीय गृहमंत्रालयाला उपलब्ध झालेला नाही. तो मिळविण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही किमान ६५ हिंसाचाराच्या घटनांमध्ये किमान १५ जण मृत्युमुखी पडले असावेत, असा अंदाज सरकारने वर्तवला आहे.
शनिवारी सहारणपूरमध्ये दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत तीन जण ठार, तर ३३ जण जखमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट- सप्टेंबरदरम्यान मुझफ्फरनगर आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या दंगलीत ६० जणांचा बळी गेला आहे, तर ९०हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर उसळलेल्या जातीय हिंसाचारात ५० हजारहून अधिक कुटुंबे निर्वासित झाली आहेत. २०१३ मध्ये झालेल्या घटनांमध्ये जखमी झालेल्यांची संख्या ३६० इतकी आहे. याशिवाय २०१२ मध्ये ११८ जातीय घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. यात ३९ जणांचा बळी गेला आहे, तर ५०० जण जखमी झाले आहेत.  
कायदा-सुवस्था खालावली
याखोलाखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ८८ जातीय घटना घडल्या आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश (८४), कर्नाटक (७३), गुजरात (६८), बिहार (६३) आणि राजस्थान (५२) यांचा क्रमांक लागतो. २०१३ या वर्षांत देशात ८२३ जातीय घटनांची नोंद झाली आहे. यात एकूण १३३ जणांचा बळी गेला आहे, तर २,२६९ जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्रात जातीय घटनांमध्ये १२ जण मृत्युमुखी पडले, तर मध्य प्रदेशात ११ जण ठार झाले आहेत. त्यामुळे या राज्यांतील कायदा-सुव्यवस्था दोन वर्षांत खालावल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maximum riots took place in up since
First published on: 30-07-2014 at 03:23 IST