बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपले भाऊ आनंद कुमार यांची बसपच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. आज त्यांनी एका कार्यक्रमावेळी नियुक्तीची घोषणा केली. त्यांना हे पद देताना मायावतींनी एक अट घातली आहे. हे पद मिळाल्यावर ते कधीही आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री होणार नाहीत अशी अट मायावतींनी घातली आहे. ही अट मान्य करुन आनंद कुमार यांनी हा पदभार स्वीकारला. आनंद कुमार हेच मायावतींचे राजकीय वारस असतील अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होती. त्याच दृष्टीने मायावतींनी हे पाऊल टाकले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर प्रथमच बसपने एखाद्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन मायावती यांनी केले. मी ईव्हीएम घोटाळ्याविरोधात आवाज उठवला आहे. माझा आवाज दाबण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत आहे असे त्यांनी म्हटले. निवडणुकीमध्ये हरल्यानंतर मायावतींनी म्हटले होते की भाजपने ईव्हीएममध्ये घोळ केला आहे. जर त्यांना खरा जनाधार असेल तर बॅलट पेपर द्वारे त्यांनी मतदान घ्यावे असे त्या म्हणाल्या होत्या. या विरोधात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी केलेले सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. ईव्हीएममध्ये घोळ करता येणे अशक्य असल्याचेही आयोगाने म्हटले होते.

गेल्या काही दिवसांपासून आपली प्रकृती देखील स्थिर नसल्याचे त्या म्हणाल्या. १९९६ ला घशातील एक ग्रंथी काढून टाकण्यात आल्यामुळे मला आता मोठ्याने भाषण करता येत नसल्याचे त्या म्हणाल्या. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री बनल्यापासून मला विनाकारण लक्ष्य करत आहेत असे त्या म्हणाल्या. माझ्या कार्यकाळामध्ये साखर कारखाना आणि स्मारकांचा घोटाळा झाला असे म्हणत त्यांनी चौकशी सुरू केली आहे. परंतु माझ्या काळात तसा कुठलाही घोटाळा झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati brother appointed as vice president evm anand kumar bsp
First published on: 14-04-2017 at 15:31 IST