दक्षिण दिल्ली महानगर पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये दक्षिण दिल्ली महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील मांसाहार विक्री करणारी दुकानं बंद राहतील, असा निर्णय दक्षिण दिल्ली महानगर पालिकेचे आयुक्त मुकेश सुर्यान यांनी जाहीर केलं आहे. त्यावरून वाद सुरू झाला असून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या निर्णयावरून खोचक सवाल केला आहे. तसेच, तृणमूल काँग्रेसच्याय नेत्या महुआ मोईत्रा यांनी देखील यावरून टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे निर्णय?

दक्षिण दिल्ली महानगर पालिकेचे आयुक्त मुकेश सूर्यान यांनी दिलेल्या माहितीनुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये दक्षिण दिल्ली परिसरातील मांसविक्री करणारं एकही दुकान सुरू नसेल. सोमवारी यासंदर्भात त्यांनी घोषणा केली. ११ एप्रिलपर्यंत ही दुकानं बंद असतील असं ते म्हणाले. “नवरात्रीच्या दिवसांमध्ये ९९ टक्के घरांमध्ये लसूण आणि कांदा देखील खाल्ला जात नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की दक्षिण दिल्लीमधील मांसविक्री करणारी दुकानं या कालावधीमध्ये बंद राहतील. या निर्णयाचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल”, असं मुकेश सूर्यान म्हणाले आहेत.

दरम्यान, या निर्णयावरून वाद निर्माण झाला असून ओमर अब्दुल्ला यांनी परखड सवाल केला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून त्यांनी हे ट्वीट केलं आहे. “रमजानच्या काळात आम्ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाही. मला वाटतं या काळात बिगर मुस्लीम रहिवासी किंवा पर्यटकांना सार्वजनिकरीत्या जेवणावर बंदी घालणं योग्य ठरेल. विशेषत: मुस्लिमबहुल भागामध्ये ही बंदी घालता येईल. जर बहुमतवाद दक्षिण दिल्लीसाठी योग्य असेल, तर तो जम्मू-काश्मीरसाठी योग्य असायलाच हवा”, असं ओमर अब्दुल्ला आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी देखील ट्विटरवरून या निर्णयावर टीका केली आहे. “मी दक्षिण दिल्लीमध्ये राहाते. मला जेव्हा हवं तेव्हा मांसाहार करण्याचा अधिकार मला राज्यघटनेनं दिला आहे. दुकानदाराला देखील त्याचा व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे”, असं मोईत्रा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

त्यामुळे दक्षिण दिल्ली महानगर पालिकेनं घेतलेल्या या निर्णयावरून निर्माण झालेला वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meat ban controversy omar abdullah mahua moitra targets south delhi corporation pmw
First published on: 06-04-2022 at 14:14 IST