विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे व्यक्तिमत्त्व अलौकिक होते. त्यांनी दुर्धर आजारावर मात करून कृष्णविवरांवर लक्षवेधी संशोधन केले. प्रत्यक्ष त्यांना पाहिलेले ‘आयुका’चे माजी संचालक डॉ. अजित केंभावी सांगत आहेत हॉकिंग यांच्या हृद्य आठवणी…

प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ असलेले स्टीफन हॉकिंग हे अलीकडच्या काळातील एक सेलेब्रिटी वैज्ञानिक होते; पण त्यांना ही प्रसिद्धी सहज मिळाली नव्हती व ती सवंगही नव्हती. त्याला दोन कारणं होती, एक म्हणजे त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता व दुसरं म्हणजे मोटर न्यूरॉन डिसीजसारख्या दुर्धर आजारावर मात करून त्यांनी विज्ञान संशोधनात केलेले मोठे काम. हॉकिंग यांचे विशेष संशोधन हे गुरुत्वाकर्षण व कृष्णविवरांच्या संदर्भात होते. त्यांना दुर्धर आजारामुळे चालता-बोलता येत नव्हते. व्हीलचेअरवर बसून संगणकाच्या मदतीने ते सगळ्या गोष्टी करीत होते. मी केंब्रिजला गेलो तेव्हा डीएएमटीपी या संस्थेत संशोधन करीत होतो. त्या वेळी तिथे अनेक प्रसिद्ध वैज्ञानिक काम करीत होते, त्यात हॉकिंग एक होते. एकदा त्या संस्थेत रशियाच्या एका प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञाचं भाषण सेमिनारमध्ये होणार होतं, ते ऐकण्यासाठी मी उपस्थित होतो. तेव्हाची ही गोष्ट मला चांगली आठवते. सभागृहात बसलो असताना अचानक थोडासा मोठा आवाज झाला, आवाजाच्या दिशेने बघितले तर एक व्हीलचेअर आत येताना दिसली. त्यावर डॉ. हॉकिंग विराजमान होते. त्यांना बघून अवाक्च व्हायला झाले. कारण या आजारातील व्यक्ती इतक्या अवघड परिस्थितीतही अशा कार्यक्रमाला येऊ शकते, यावर सहजपणे कुणाचा विश्वास बसणार नाही. खरं सांगायचं तर तो प्रख्यात रशियन वैज्ञानिक हॉकिंग यांचा सभागृहात झालेला प्रवेश बघून नव्र्हस झाला होता. नंतर भाषण संपल्यावर हॉकिंग यांनी त्या वैज्ञानिकास काही प्रश्नही विचारले. ते काय म्हणाले हे मला समजले नाही, कारण तो संगणकातून निघालेला यांत्रिक स्वर होता. मग त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांनी नेमका काय प्रश्न विचारला हे सांगितलं. नंतर त्या वैज्ञानिकानेही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हॉकिंग यांचे व्यक्तिमत्त्व असे लक्षवेधी बनत गेले. त्या वेळी डेनिस शियामा हे हॉकिंग यांचे गुरू होते. त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध होते.

हॉकिंग यांच्या मित्रांपैकी एक म्हणजे मार्टिन रिस. त्यांनी केंब्रिजमध्ये असताना मला जेवायला बोलावले. त्यासाठी त्यांनी भारतीय रेस्तराँमध्ये सोय केली होती. जिथे कार्यक्रम ठरला होता तिथे एक गाडी आली. त्यातून डॉ. रिस उतरले. ते व आणखी दोघा जणांनी डॉ. हॉकिंग यांना थेट उचलूनच हॉटेलच्या खोलीत आणले. उचलणारेही थोर व ज्यांना उचलायचे तेही थोर असा हा सगळा प्रसंग. ते सगळं पाहिलं तेव्हा असं वाटून गेलं की, मोठय़ा माणसांची साधी रूपही असतात. मी जे हॉकिंग पाहिले ते आजार जडल्यानंतरचे होते. ते खूप कणखर होते एवढंच त्यांच्या देहबोलीवरून मला उमगलं. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ते नर्मविनोदी शैलीत देत असत, ती त्यांची खासियत. डॉ. नारळीकर व डॉ. हॉयल यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतावर त्यांनी एक शोधनिबंध लिहिला होता. तो सिंग्युलॅरिटी म्हणजे एकत्व व विश्वाच्या उत्पत्तीबाबत होता. त्या वेळी त्यांनी अनेक अवघड समीकरणे मांडली. हॉकिंग यांनी कृ ष्णविवरांचा अभ्यास करताना आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत वापरून पुंज भौतिकीचा अभ्यास केला. कृष्णविवरांचं संशोधन अवघड असतं. दुर्धर आजारामुळं हॉकिंग शब्दश: विकलांग होते. त्यांना पेन, पेन्सिल हातात घेऊन कुठली आकडेमोड करता येत नव्हती. जे करायचं ते सगळं मेंदूतच. तेथेच साठवायचं. सगळं लक्षात ठेवून संशोधनाच्या प्रत्येक पायरीवर पुढं जायचं हे अगदी अवघड, पण ते त्यांनी करून दाखवलं. त्यांचा संशोधन निबंध पाहण्यासारखा असायचा, अधिकारवाणीनं लिहिलेला. सामान्य माणसाला कदाचित त्यातलं काही समजणार नाही, पण हे काही तरी वेगळं आणि भव्यदिव्य आहे हे मात्र समजून जायचं. त्यांच्याबरोबर नर्स, डॉक्टर यांच्यासह पाच-दहा लोकांचा जामानिमा सहज असे. तरी त्यांना जगातून बोलावणं येत असे, त्यातून ते अनेक देश फिरले. लोकांनीही त्यांचं आगतस्वागत तेवढय़ाच प्रेमानं व उत्साहानं केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंब्रिजमध्ये असतानाची त्यांची आणखी एक आठवण आहे. त्या वेळी मी डॉ. बर्नार्ड कार यांच्या बंगल्यात भाडय़ाने राहात असे. त्या वेळी तेथे हॉकिंग एकदा आल्याचे आठवते. मी त्या वेळी सायकलवर फिरत असे. हॉकिंग यांची गाडी कधीकधी जाताना दिसायची. ते सिग्नलला थांबलेले असायचे. त्यांना मदत करावी, असं मला नेहमी वाटायचं; पण त्यांना त्या आजारातही मार्ग काढून सहजपणे वावरण्याची सवय झाली होती. भारतात अशा पद्धतीनं ते रस्त्यानं कधीच फिरू शकले नसते, कारण आपण वाहतूक शिस्त पाळतच नाही. तिथे त्यांच्यासारखी व्यक्तीही रहदारीतून जाऊ शकते हे विशेष वाटायचं. त्यांची काही भाषणंही मी ऐकली होती. त्यांचे भाषण ते रेकॉर्ड करून आणीत. नंतर ते मंचावर येत असत. भाषण संपलं की, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संगणकाच्या माध्यमातून तयार केलेल्या यंत्राच्या मदतीनं देत असतं. त्यांच्याकडे पाहून या माणसाची जिद्द, धैर्य याला सलाम करावा असंच वाटायचं. पूर्वीच्या काळात जसा आइन्स्टाइन आबालवृद्धांना परिचयाचा होता तसे आजच्या काळात हॉकिंग हे सर्वाना माहिती असलेले वैज्ञानिक होते. दुर्धर आजारातही नियतीवर मात करून पायाभूत संशोधन करणाऱ्या हॉकिंग यांचे व्यक्तिमत्त्व अलौकिक होते यात शंका नाही.

(शब्दांकन – राजेंद्र येवलेकर)