देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी एका कार्यक्रमात बोलताना “महात्मा गांधींनीच सावरकरांना दया याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला होता”, असा दावा केला आणि या मुद्द्यावरून देशभरात चर्चा सुरू झाली. सावरकरांनी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ब्रिटिश सरकारसमोर सादर केलेल्या सुटकेसाठीच्या याचिकांवरून मोठा वाद असताना त्यात राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानामुळे भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर इतिहासतज्ज्ञ संबंधित दाखले पुराव्यादाखल देऊन सत्य परिस्थिती काय होती, याविषयी भूमिका मांडत आहेत. इतिहास अभ्यासक विक्रम संपत यांनी देखील टाईम्स नाऊला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सावरकरांच्या दया याचिका आणि महात्मा गांधींचा सल्ला याविषयीचा नेमका घटनाक्रम सांगितला आहे.

‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी’चा संदर्भ

‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी’च्या खंडांमध्ये गांधीजींनी सावरकरांचे धाकटे बंधू नारायण सावरकर यांना पाठवलेल्या पत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या पत्रांवरून यासंदर्भात सविस्तर घटनाक्रम समोर येत आहे. त्यानुसार, वीर सावरकर आणि त्यांचे मोठे बंधू गणेश सावरकर हे तुरुंगात असताना पहिल्या जागतिक महायुद्धानंतर जॉर्ज पाचवे यांनी एक आदेश काढला होता त्यानुसार, सर्व राजबंद्यांना अर्थात राजकीय कैद्यांना सोडून देण्यात आलं होतं. मात्र, फक्त सावरकर बंधूंना कैदेत ठेवलं होतं.

महात्मा गांधींचा सल्ला

यावेळी सावरकरांचे धाकटे बंधू नारायण सावरकर यांनी महात्मा गांधींना पत्र लिहून यासंदर्भात काय करावं अशा विचारणा केली होती. तेव्हा महात्मा गांधींनी नारायण सावरकरांना पाठवलेल्या पत्रामध्ये सावरकर बंधूंना ब्रिटिश सरकारकडे सुटकेसाठी याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला होता. तसेच, मी देखील माझ्या बाजूने प्रयत्न करेन, असं देखील महात्मा गांधींनी या पत्रात नारायण सावरकरांना सांगितलं.

‘यंग इंडिया’मधला ‘तो’ लेख!

२५ जानेवारी १९२० रोजी गांधीजींनी हे पत्र नारायण सावरकरांना लिहिलं. त्याच्या ६ महिन्यांनंतर गांधीजींनी यंग इंडिया या नियतकालिकामध्ये २६ मे १९२० रोजी सावरकर बंधूंना पाठिंबा देणारा एक लेख लिहिला होता. या लेखामध्ये सावरकर बंधू देशभक्त असून त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचा संदर्भ गांधीजींनी दिला आहे. त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी भूमिका महात्मा गांधींनी या पत्रामध्ये मांडली आहे.

महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी दाखल केली होती दया याचिका : राजनाथ सिंह

दरम्यान, सावरकरांनी याआधी देखील अनेकदा अशा याचिका दाखल केल्या होत्या, पण १९२० साली दाखल केलेली याचिका महात्मा गांधींच्या सल्लानुसार दाखल केली होती, असं इतिहास अभ्यासक विक्रम संपत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी जर सावरकरांनी सर्व याचिका गांधीजींच्या सल्ल्याने दाखल केल्याचं म्हटलं असेल, तर ते चूक असल्याचं देखील संपत यांनी नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्या दिवसांत अशा याचिका होणं हे सामान्य”

“त्या दिवसांमध्ये अशा याचिका दाखल करणं फार सामान्य बाब होती. आजकाल त्याला दया याचिका म्हटलं जातं, पण ते सत्य नाही. असंख्य राजकीय कैदी अशा याचिका दाखल करत होते. गांधीजींना ही प्रक्रिया माहिती होती. त्यामुळे त्यांनी याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. ही कोणत्याही दृष्टीने दया याचिका नव्हती”, असं देखील संपत म्हणाले आहेत.