एपी, क्विटो

इक्वेडोरच्या माजी उपाध्यक्षांना अटक करण्यासाठी राजधानी क्विटो येथील मेक्सिकोच्या दूतावासात घुसून पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. इक्वेडोरच्या पोलिसांनी थेट दूतावासात घुसण्याची कारवाई केल्यानंतर मेक्सिकोने त्या देशाशी असलेले राजनैतिक संबंध तोडले आहेत. या प्रकारे पोलीस दलाचा असाधारण वापर केला गेल्यामुळे त्या भागामधील नेते आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

इक्वेडोरचे माजी उपाध्यक्ष जॉर्ज ग्लास हे गेल्या डिसेंबरपासून मेक्सिकोच्या दूतावासात वास्तव्य करून होते. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरल्यानंतर त्यांनी मेक्सिकोकडे राजकीय आश्रय मागितला होता. त्यांना अटक करण्यासाठी इक्वेडोरचे पोलीस शुक्रवारी दूतावासात घुसले. या छाप्यामुळे धक्का बसललेल्या मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी शुक्रवारी संध्याकाळीच इक्वेडोरशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली. तर, इक्वेडोरच्या या कारवाईला हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले जाईल असे मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले.

हेही वाचा >>> खरगेंची मानसिकता तुकडे-तुकडे टोळीची! अनुच्छेद ३७०वरून पंतप्रधान मोदींची टीका

इक्वेडोरमध्ये २०१६च्या शक्तिशाली भूकंपात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्या भूकंपानंतर हाती घेण्यात आलेल्या पुनर्बाधकामामध्ये अनियमितता करण्यात आल्याचा ग्लास यांच्यावर आरोप आहे. त्याबाबत त्यांची चौकशी केली जात आहे. ते पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे मेक्सिकोच्या दूतावासात प्रवेश करण्याचा निर्णय इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी घेतला अशी माहिती परराष्ट्रमंत्री गॅब्रिएला सॉमरफिल्ड यांनी दिली.

मेक्सिकोच्या दूतावासातील प्रमुख अधिकारी रॉबटरे कान्सेको यांनी या घडामोडींबद्दल चिंता व्यक्त करताना, जॉर्ज ग्लास यांना ठार केले जाईल अशी भीती व्यक्त केली. ग्लास यांना शनिवारी क्विटोमधील अ‍ॅटर्नी जनरलच्या कार्यालयातून ग्वायाक्विल येथे नेण्यात आले असून तिथे त्यांनी कमीत कमी सुरक्षा असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांच्या कार्यालयाबाहेर लोक जमले होते. ग्लास यांच्या अ‍ॅटर्नी सोनिया व्हेरा यांना एपीला सांगितले की, ‘‘पोलिसांनी त्यांना अटक करताना मारहाण केली. त्यांना चालता येईनासे झाले तेव्हा त्यांना ओढत घेऊन गेले. तसेच त्यांच्या वकिलांना त्यांच्याशी बोलू दिले नाही’’, असा आरोप त्यांनी केला.