नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने नोटीस बजावली असून यावरुन वादही निर्माण झाला आहे. अखेर याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एखाद्या खासदाराने तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत संबंधितांना नोटीस बजावली जाते. यात कोणतेही राजकारण नसून ही नियमानुसार केलेली साधीसरळ कारवाई आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी ‘ब्लॅक ऑप्स लि.’ या कंपनीच्या कागदपत्रांवर ब्रिटनचा नागरिक असल्याचे म्हटल्याचा आरोप आहे. भारतात दुहेरी नागरिकत्व बेकायदा असून या प्रकरणी केंद्राने राहुल यांचे नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे तक्रारही केली होती. या तक्रारीच्या आधारे गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.
निवडणुकीच्या काळातच राहुल गांधी यांना नोटीस बजावल्याने मोदी सरकारवर टीका होत आहे. काँग्रेसनेही यावरुन भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांना देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, या नोटिशीमागे कोणतेही राजकारण नाही. एखाद्या खासदाराने तक्रार केल्यास संबंधितांना नोटीस बजावली जाते. ही साधीसरळ कारवाई आहे. राहुल गांधी काय उत्तर देणार हे देखील महत्त्वाचे आहे.
Union Home Minister Rajnath Singh on MHA notice to Congress President Rahul Gandhi over citizenship: When a member of Parliament writes to any ministry, action required on their query is taken. It is not a big development, it is normal process. pic.twitter.com/nziFJzg801
— ANI (@ANI) April 30, 2019
काँग्रेसने सुब्रमण्यम स्वामी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला म्हणाले, ‘राहुल गांधी हे जन्मापासूनच भारतीय आहेत आणि आम्ही भाजपा खासदाराचे आरोप फेटाळून लावतो. मोदींकडे बेरोजगारी, काळा पैसा यावर उत्तर नसल्याने ते खोट्या आरोपांच्या आधारे नोटीस बजावून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.