नवी दिल्ली : हवाई दल ‘मिग-२१’ लढाऊ विमाने सप्टेंबर २०२५मध्ये निवृत्त करणार असून, या विमानांची जागा ‘तेजस हलके लढाऊ विमान (एलसीए) मार्क १ ए’ ही विमाने घेतील. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली.

भारतीय हवाई दलात मिग-२१ विमाने १९६३मध्ये दाखल झाली. हवाई दलासाठी ६२ वर्षे सेवा बजावल्यानंतर या विमानांची जागा देशी बनावटीची तेजस विमाने घेतील. मिग-२१ विमानांच्या स्क्वाड्रन्स सध्या राजस्थानमधील नाल हवाई तळावर आहेत. मिग-२१ लढाऊ विमाने भारताच्या ताफ्यातील पहिली स्वनातीत विमाने आहेत.

तत्कालीन सोव्हिएत रशियाबरोबर १९६३मध्ये ही विमाने खरेदी करण्याचा करार झाला. भारत-पाकिस्तानमध्ये १९६५ मध्ये झालेल्या युद्धादरम्यान या विमानांचा वापर मर्यादित होता. पण, नंतरच्या विविध लष्करी संघर्षात या विमानांचा वापर झाला. यात १९७१चे युद्ध, १९९९चे कारगिल युद्ध यांचाही समावेश आहे.

२०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ल्यादरम्यानही या विमानांचा वापर करण्यात आला. या वेळी झालेल्या संघर्षात एक मिग-२१ विमान पडले. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्तानने पकडले होते. हवाई दलाच्या ताफ्यातील मुख्य विमान असले, तरी विविध अपघातांमुळे ही विमाने चर्चेत राहिली. २०२३मध्ये राजस्थानमधील उत्तरलाई येथील मिग-२१ आणि सुखोई-३० एमकेआय विमानांची स्क्वाड्रन निवृत्त करण्यात आली होती.

उडती शवपेटिका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिग-२१ विमानांना होणाऱ्या अपघातांमुळे याची गणना उडती शवपेटिका (फ्लाइंग कॉफिन) अशी व्हायला लागली होती. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या ६० वर्षांत ५००पेक्षा जास्त मिग-२१ विमाने कोसळली असून त्यामध्ये १७०पेक्षा जास्त वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. विमाने कोसळण्यामागे तांत्रिक दोष, मानवी चूक, पक्ष्यांची धडक किंवा वैमानिकांची अवकाशीय दिशाभूल अशी विविध कारणे सांगितली गेली.