आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत सध्या अराजक माजले आहे. आर्थिक गर्तेत सापडल्यामुळे येथील जनतेने सरकारविरोधात तीव्र आंदोलन पुकारले आहे. हजारो आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घराला आग लावली आहे. तर अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या कोलंबो येथील अतिसुरक्षित भागातील शासकीय निवासस्थानात आंदोलक घुसले आहेत. दरम्यान, नागरिक महागाई, आर्थिक संकटाने त्रस्त असताना श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या शासकीय निवासस्थानी घरात लाखो रुपये सापडल्याचे म्हटले जात आहे. तसा दावा आंदोलकांनी केला असून तसे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

हेही वाचा >>> रशिया-युक्रेन युद्धादरम्यान झेलेन्स्की यांनी भारतीय राजदूतांना हटवले; कारण सांगण्यास नकार

श्रीलंकेतील नागरिक सध्या महागाई, औषध, खाद्यपदार्थ, इंधनाचा तुटवडा या समस्यांना तोंड देत आहेत. असे असताना राजपक्षे यांच्या निवासस्थानी आंदोलकांना लाखो रुपये सापडले आहेत, असे म्हटले जात आहे. तसे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये आंदोलक राजपक्षे यांच्या निवासस्थानी पैसे मोजत असल्याचे दिसत आहे. याबाबतचे वृत्त डेली मिररने दिले असून हे सर्व पैसे सुरक्षा यंत्रणेकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>> अर्थसंकटग्रस्त श्रीलंकेत अराजक; पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या घराला आग; अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलकांचा ताबा

श्रीलंकेतील संतप्त आंदोलकांनी राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलकांनी राजपक्षे यांचे शासकीय निवासस्थान ताब्यात घेतले असून येथे हजारो आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. तर दुसरीकडे राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्रीच पोबारा केला असून ते नेमके कोठे आहेत? हे समजू शकलेले नाही. राजपक्षे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन कायम ठेवू असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे.

हेही वाचा >>> “चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होईल”; शशीकांत दास यांनी व्यक्त केला विश्वास

दरम्यान, श्रीलंका देशात सध्याची अराजकता लक्षात घेता येथील पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी राजीनाम्याची घोषणा केली. सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे विक्रमसिंघे यांनी सांगितले आहे. तर शुक्रवारी (८ जुलै) अज्ञातस्थळी गेलेले श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे हेदेखील बुधवारी राजीनामा देणार आहेत. येथील संसदेचे सभापती महिंद्र अबेयवर्धने यांनी ही घोषणा केली आहे.