मुलींचं लग्नासाठीचं वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. त्यामुळे आता यासंदर्भातलं विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावरून सध्या देशात मोठी चर्चा सुरू आहे. एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी देशाचा पंतप्रधान निवडू शकतो, मग लग्न कधी करायचे हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इम्तियाज जलील म्हणाले, “मला मोदींना हा विचारायचं आहे की मुलींच्या लग्नासाठीचं वय वाढवून काय साध्य करणार आहेत? १८ वर्षांचं झाल्यावर मी देशाचा पंतप्रधान कोण होणार हे निवडू शकतो. आमदार-खासदार निवडू शकतो. १८ वर्षाचं झाल्यावर मी करारावर स्वाक्षरी करू शकतो. व्यवसाय सुरू करू शकतो. असं असताना केवळ लग्नासाठी हे विधेयक आणणं कितपत योग्य आहे? सरकारचा यामागे काय तर्क आहे हे त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे.”

“१८ वर्षांचं झाल्यावर सर्व परवानग्या, मग लग्न कधी करायचं हे सांगणारे तुम्ही कोण?”

“सरकारला आपल्या तरूण पीढित किती सामर्थ्य आहे, किती ऊर्जा आहे हे माहिती नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही १८ वर्षांचं झाल्यावर सर्व परवानग्या देत आहात मग लग्न कधी करायचं हे तुम्ही कोण सांगणारे?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला.

“काका फक्त बसून प्रश्न विचारतात, आता काका म्हणतायत लग्न करू नका”

दरम्यान, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला होता. मोदींना नेमकी लग्नाबद्दल अडचण काय आहे? असा खोचक सवाल त्यांनी विचारला होता.

१८ वर्षांनंतर लैंगिक संबंधांना परवानगी, पण..

महिलांचं लग्नाचं वय वाढवण्याला ओवैसी यांनी विरोध दर्शवला आहे. “आता केंद्रानं महिलांसाठी लग्नाचं वय १८ वरून २१ पर्यंत वाढवलं आहे. कायद्यानुसार तुम्ही एखाद्या महिलेसोबत १८व्या वर्षानंतर लैंगिक संबंध ठेवू शकता. पण तुम्ही तिच्याशी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नाबद्दल नेमकी काय अडचण आहे?” असं ओवैसी म्हणाले आहेत. मीरतमध्ये एका सभेमध्ये ते बोलत होते.

हेही वाचा : Explained : मुलींच्या लग्नाचं किमान वय वाढवण्याचा कायदा काय? मुख्य कारणं कोणती? वाचा सविस्तर…

“आता भाजपा म्हणेल की…”

“आता भाजपा म्हणेल की ओवैसी आणि मुस्लिम महिलांच्या फायद्याच्या गोष्टीवर बोलत नाहीत. मोदीजी, तुम्ही आमचे काका कधीपासून झालात? कारण काका लोक फक्त जागेवर बसून प्रश्न विचारत राहतात. आता काका म्हणतायत लग्न करू नका”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim imtiyaz jaleel oppose increase in marriage age for girls in india pbs
First published on: 20-12-2021 at 14:01 IST