Minister Ashwini Vaishnaw Using Zoho Software : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी (२२ सप्टेंबर) घोषणा केली के ते आता स्वदेशी प्लॅटफॉर्म झोहोचा (Zoho) वापर करू लागले आहेत. झोहो हा कागदपत्रांशी संबंधित कामे (पेपर वर्क), स्प्रेडशीट व सादरीकरणासाठी (प्रेझेन्टेशन) भारतात विकसित करण्यात आलेला स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे. वेष्णव यांनी सर्व भारतीयांना आवाहन केलं आहे की तुम्ही देखील ‘स्वदेशी’च्या या मोहिमेत सहभागी व्हा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना सर्वांनी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू, भारतात तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला रेल्वेमंत्र्यांनी प्रतिसाद देत कार्यालयीन कामासाठी स्वदेशी प्लॅटफॉर्म झोहोचा वापर सुरू केला आहे. तसेच वैष्णव यांनी सर्व भारतीयांना आवाहन केलं आहे की त्यांनी पंतप्रधान मोदींना साद देत स्वदेशीच्या वापराबाबतच्या मोहिमेत सहभागी व्हावं.

अश्विनी वैष्णव यांच्याकडून स्वदेशीच्या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन

वेष्णव यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या कार्यालयात झोहो प्लॅटफॉर्मचा वापर करून कार्यालयीन काम करत असल्याचं दिसत आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मी झोहोवर शिफ्ट होतोय. हा आपला स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म पेपर वर्क, स्प्रेडशीट व प्रेझेन्टेशनसाठी तयार करण्यात आला आहे.”

रेल्वेमंत्र्यांनी इतरांनाही हा भारतीय प्लॅटफॉर्म वापरण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “आपण स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवल्यामुळे भारत आत्मनिर्भर होईल. तसेच, अशा प्लॅटफॉर्मचा वापर केल्याने जागतिक व्यासपीठावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची ओळख निर्माण होईल.”

झोहोच्या संस्थापकांनी मानले आभार

अश्विनी वैष्णव यांनी उचललेलं हे पाऊल पाहून झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी त्यांचे आभार मानले आहेत. अम्बू यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की रेल्वेमंत्र्यांचा हा निर्णय आमच्या इंजिनियर्सचं मनोबलं वाढवेल. आमचे इंजिनियर्स दोन दशकांपासून वेगवेगळी उत्पादनं विकसित करत आहेत. त्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. आज त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. तुम्हाला व देशाला अभिमान वाटेल असं काम आम्ही करत राहू.