पीटीआय, नवी दिल्ली
काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असून, भारताच्या काश्मीरबद्दलच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याबाबत नव्याने प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर भारताने आपली भूमिका स्पष्ट करत प्रत्युत्तर दिले.

‘‘जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवले पाहिजेत, अशी आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका आहे,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल ट्रम्प यांच्या प्रस्तावावरील प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान अणुयुद्ध होण्याचा धोका होता या ट्रम्प यांच्या अटकळींवर जयस्वाल म्हणाले की, भारताची लष्करी कारवाई पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनेच होती. ‘पाकिस्तानच्या राष्ट्रीय कमांड प्राधिकरणाची १० मे रोजी बैठक होणार असल्याच्या काही बातम्या आल्या होत्या. परंतु नंतर त्यांनी हे नाकारले. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वत: अण्वस्त्राच्या दृष्टिकोनाचे खंडन केले आहे,’ असे जयस्वाल म्हणाले. ‘पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांना जुमानत नाही किंवा त्यांचा वापर करून सीमापार दहशतवाद घडवू दिला जाणार नाही,’ असे याआधीच खडसावल्याचे त्यांनी नमूद केले.

‘जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत भारत सिंधू जलवाटप करार स्थगित ठेवेल. पाकिस्तानने अगदी व्यावसायिक पातळीवर दहशतवादाला पोसले आहे,’ असा आरोपही जयस्वाल यांनी केला. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने नष्ट केलेले दहशतवादी तळ केवळ भारताच्याच नव्हे तर जगभरातील अनेक निष्पाप लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानविरोधात आर्थिक आणि राजनैतिक पातळीवर कठोर कारवाई सुरूच राहील असे जयस्वाल यांनी सांगितले. पाकिस्तानबरोबर सदिच्छा आणि मैत्रीच्या आधारावर सिंधू जलकरार करण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देऊन या तत्त्वांची पायमल्ली केली अशी भूमिका त्यांनी मांडली.

भारताच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानने बेकायदेशीर पद्धतीने व्यापलेला भारतीय भूभाग (पाकव्याप्त काश्मीर) त्यांच्या तावडीतून सोडवणे, हाच यातील प्रलंबित प्रश्न आहे- रणधीर जयस्वाल, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय

कारवाईत पाकिस्तानचे ११ सैनिक ठार

इस्लामाबाद : भारताबरोबर झालेल्या संघर्षात पाकिस्तानच्या संरक्षण दलांतील ११ सैनिक ठार झाले असून, ७८ जण जखमी झाल्याची कबुली पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. मात्र, त्याच वेळी ४० नागरिक आणि १२१ इतर जखमी झाल्याचा दावाही केली आहे.

पाकिस्तानच्या लष्कराने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. ६ आणि ७ मे च्या रात्री भारताने विनाकारण केलेल्या हल्ल्यात सैनिक आणि नागरिक मृत्युमुखी पडल्याचे त्यात म्हटले आहे. त्यात हवाई दलाचा स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफ, मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, वरिष्ठ तंत्रज्ञ नजीब आणि मुबाशीर, कार्पोरल तंत्रज्ञ फारुक आदींचा समावेश आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत कारवाईनंतर पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. ८, ९ आणि १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये चकमकी उडाल्या. चार दिवसांच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर शनिवारी शस्त्रविराम झाला.