एका १४ वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उत्तर दिल्ली जिल्ह्यातील नरेला भागात घडली आहे. शनिवारी नरेला औद्योगिक परिसरातील एका बंद दुकानात पीडितेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी सात टीम तयार करून, १०७ लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना एका आरोपीला अटक करण्यात यश आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त ब्रिजेंद्र कुमार यादव यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, १२ फेब्रुवारी रोजी १४ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. तिचे आई-वडील आणि भावाने तिचा शोध सुरू केला. मात्र तीन दिवसांनंतरही ती न सापडल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि शोध सुरू केला. याच दरम्यान, शनिवारी पोलिसांना नरेला औद्योगिक परिसरातील सन्नोथ गावातील एका दुकानदाराचा फोन आला. त्याने पोलिसांना सांगितले की, तो काही दिवसानंतर झाशीहून परतला असून त्याला त्याच्या दुकानातून दुर्गंधी येत आहे. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि दुकानातील गोण्यांमध्ये शेणाच्या गोवऱ्याच्या ढिगाऱ्याखाली बेपत्ता मुलीचा अर्धवट कुजलेला मृतदेह सापडला.

याचवेळी दुकानदाराने आपले दोन कामगार बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या घरावर छापा टाकला मात्र ते तेथे सापडले नाहीत. त्यानंतर सोमवारी एका आरोपीला सनोथ येथे पकडण्यात आले तर दुसरा फरार आहे. हे दोघेही मूळ उत्तर प्रदेशातील हरदोई येथील रहिवासी असून दिल्लीत एकमेकांच्या शेजारी राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला जेवण देण्याचे आमिष दाखवले. ते दोघेही दारू पिऊन होते. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबद्दल मुलीने आई-वडिलांना सांगणार असल्याचं म्हणताच आरोपींनी कपड्याने तिचा गळा आवळून खून केला.