ईशान्य दिल्लीत एका १६ वर्षीय मुलाने १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं धारदार चाकूने तरुणाच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि कानावर अनेक वार केले. एवढंच नव्हे तर चाकूने वार केल्यानंतर नराधम आरोपी मृतदेहाशेजारी नाचताना दिसला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हत्येच्या वेळी आरोपी तरुण हा दारुच्या नशेत होता. त्याने चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केला होता. भयावह पद्धतीने हत्या केल्यानंतर आरोपीनं पीडित तरुणाच्या खिशातून ३५० रुपये चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार दिल्लीतील वेलकम परिसरात घडला.

हेही वाचा- घरात घुसून महाविद्यालयीन तरुणीचा चिरला गळा, आई-वडील घराबाहेर असताना घडला प्रकार

व्हायरल व्हिडीओत आरोपी धारदार चाकूने पीडित तरुणावर अनेकदा सपासप वार करताना दिसत आहे. त्याने पीडित तरुणाच्या चेहऱ्यावर, कानावर, मानेवर अनेक वार केले. एवढंच नव्हे तर आरोपी मृतदेहाशेजारी गुडघे टेकून खाली बसला आणि पीडित तरुणाच्या मानेचे व डोक्याचे तुकडे करताना दिसला. तसेच पीडितेच्या डोक्यात लाथाही मारल्या. यानंतर आरोपीने मृतदेहाशेजारी अचानक काही सेकंदांसाठी डान्सही केला आहे.

हेही वाचा- आधी बलात्कार मग अमानवी छळ; प्रेयसीला १११ वेळा भोसकून मारणाऱ्या नराधमाची तुरुंगातून सुटका, नेमकं कारण काय?

या घटनेची अधिक माहिती देताना ईशान्य दिल्लीचे पोलीस उपायुक्त म्हणाले की, मी स्वतः आरोपीला घटनेमागचं कारण विचारलं. त्याने सांगितलं की त्याला पीडित तरुणाकडून पैसे हिसकावून घ्यायचे होते, म्हणून त्याने आधी त्याचा गळा दाबला. पीडित तरुण बेशुद्ध झाल्यानंतर चाकूने वार केले. आरोपीनं पीडित तरुणाच्या खिशाची झडती घेतली असता त्याला ३५० रुपये सापडले. एखाद्या सामान्य घटनेत दरोडेखोर पैसे लुटून निघून जातो, परंतु या प्रकरणात आरोपीच्या मनात काय आले हे मला माहीत नाही, त्याने पीडित तरुणावर अनेक वेळा वार केले, असंही उपायुक्तांनी सांगितलं.