Political scientist Ian Bremmer Praise PM Modi Over embarrassing Trump on India-Pak : राजकीय संशोधक आणि युरेशिया ग्रुपचे अध्यक्ष इयान ब्रेमर यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवल्याच्या दाव्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लज्जित करणे मोदी सहजपणे टाळू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही असेही ब्रेमर म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आपण मध्यस्थी केल्याचा वारंवार दावा केला होता, मात्र भारताने त्यांचा हा दावा नाकारला होता. या पार्श्वभूमीवर ब्रेमर यांचे हे विधान आले आहे.
“चिनी ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहिले. आणि रशियन लोकांनीही ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतली…. आणि मला वाटते की मोदी देखील त्याच भूमिकेत आहेत…. भारत पाकिस्तान मुद्द्यावर मोदी सहजपणे ट्रम्प यांचे लज्जित करणे टाळू शकले असते, पण त्याऐवजी मोदींनी ‘नाही, तुमचा याच्याशी काहीही संबंध नाही’ असे जाहीरपणे सांगणे स्वीकारले आणि खरंच ट्रम्प यांना जागतिक स्तरावर लज्जित केले.”
इयान ब्रेमर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करणाऱ्या देशांचा उल्लेख करत नमूद केले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पर्वा करत नाहीत आणि त्यांना फक्त जगाला आपली ताकद दाखवण्यात रस आहे. “त्यांचे मत आहे की, ‘मी शक्तिशाली आहे, मी राष्ट्राध्यक्ष आहे; तुम्ही माझे ऐकलेच पाहिजे…’,” असे ब्रेमर म्हणाले.
मोदी काय म्हणाले होते?
जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आपण थांबवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर भाष्य केले होते. लोकसभेत बोलताना मोदी म्हणाले होते की, “जगातील कोणत्याही नेत्याने भारताला लष्करी कारवाई थांबवण्यास सांगितले नाही.” पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी शस्त्रविरामाची घोषणा होण्याच्या एक दिवस आधी, ९ मे रोजी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या फोन कॉलला उत्तर देता आले नाही, कारण पंतप्रधान मोदी हे लष्कराबरोबर बैठकीत होते.
त्यावेळी जे. डी व्हान्स यांनी त्यांना सांगितले की पाकिस्तान मोठा हल्ला करण्याची योजना आखत आहे, त्यावर पंतप्रधान मोदी उत्तर देत म्हणाले की, “जर पाकिस्तानचा हा हेतू असेल, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल.”
पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचा दावा जाहीरपणे नाकारल्या बद्दल बोलताना इयान ब्रेमर यांनी या धोरणात्मक निर्णयाचे कौतुक केले. “जरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोदींपेक्षा खूप शक्तिशाली असले तरी वैयक्तिकरित्या हे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आणि अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांना अडचणीत आणले. या परिस्थितीत इतर बहुतेक नेत्यांनी शांत राहणे पसंत केले असते. त्यांनी ते सहन केले असते,” असे ब्रेमर म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष झाल्यानंतर मे महिन्यात शस्त्र विरामावर एकमत झाले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशात मध्यस्थी केल्याचा वारंवार दावा केला. त्यांचा हा दावा भारताने सतत नाकारला.