scorecardresearch

“मोदींच्या दाढीत घरचं घर आहेत, एकदा झटकली की ५० लाख घरं पडतील” ; भाजपा खासदाराचं विधान!

“तुम्ही मोदींची दाढी पाहा, जेव्हा पाहणं बंद कराल तेव्हा…” असंही म्हणाले आहेत.

“मोदींच्या दाढीत घरचं घर आहेत, एकदा झटकली की ५० लाख घरं पडतील” ; भाजपा खासदाराचं विधान!
(संग्रहीत, प्रातिनिधिक छायाचित्र)

मध्य प्रदेशमधील रीवा येथील भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांनी आपल्याचे पक्षाचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक विचित्र विधान केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीतून पंतप्रधान घरकुल योजनेतील घरं पडत असल्याचं म्हटलं आहे. मोदींनी एकदा दाढी झटकली की ५० लाख घरं त्यातून पडतात, असं खासदार जनार्दन मिश्रा एका सामूहिक कार्यक्रमात म्हणाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत भाजपा खासदार जनार्दन मिश्रा स्थानिक बोली भाषेत नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले आहेत की, “जोपर्यंत देशात एका एका व्यक्तीला पंतप्रधान घरकुल मिळणार नाहीत, तोपर्यंत मोदींच्या दाढीमधून घरच-घर पडतील. पडत राहतील. मोदींच्या दाढीत घरच घर आहेत.”

पुढे त्यांनी म्हटले की, जोपर्यंत दाढी राहील तोपर्यंत कुणीही विना घरकुलाचं राहणार नाही. मोदी आपली दाढी एकदा झटकतात तर ५० लाख घरे त्यातून पडतात. दुसऱ्यांदा दाढी हलवतात तर १ कोटी घर त्यातून निघतात. जेव्हा जेव्हा आमदार म्हणतील तोपर्यंत दाढीतून घर पडत राहतील. याच दरम्यान त्यांनी तिथे उपस्थित लोकांना हे देखील सांगितले की तुम्ही मोदींची दाढी पाहा, जेव्हा पाहणं बंद कराल तेव्हा घरकुल मिळणं देखील बंद होईल.

खासदारांनी केलेल्या या अजब विधानानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला आणि त्यांनी टाळ्या देखील वाजवल्या. विशेष म्हणजे याप्रसंगी स्थानिक आमदार केपी त्रिपाठी हे देखील उपस्थित होते. खासदार मिश्रा यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर खासदार मिश्रा यांनी स्पष्टीकरणही दिलेलं आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार हा व्हिडिओ ३ नोव्हेंबरचा आहे, जेव्हा भाजपा खासदार मिश्रा यांनी आपल्या मतदारसंघातील एका रस्ते कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावली होती. आपल्या अजब विधानावर स्पष्टीकरण देताना खासदार मिश्रा यांनी सांगितले की, लोकांच्या मनातील पंतप्रधान घरकुल संपण्याची भीती दूर करण्यासाठी त्यांनी लोकांना ही बाब समजावली आणि सांगितले की जोपर्यंत पंतप्रधान मोदींची दाढी आहे तोपर्यंत लोकांना घरकुल मिळत राहतील.

जनार्दन मिश्रा यांनी अशाप्रकारचं विचित्र विधान करणे हे पहिल्यांदा घडलेलं नाही. या अगोदर देखील त्यांच्या एका विधानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यामध्ये त्यांनी रीवाच्या महापालिका आयुक्तांना जिवंत गाडण्याचं म्हटलं होतं. त्या व्हायरल व्हिडिओत ते म्हणत होते की, घरात कुदळ आणि कुऱ्हाडीला धार लावून ठेवा, मनपा आयुक्त पैसे मागायला आले की खड्डा खणून त्यात टाका.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2021 at 22:22 IST

संबंधित बातम्या