चीनविरोधात समर्थपणे उभे राहणारे नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते असल्याचे कौतुकोद्गार चीनविषयक घडामोडींचे अभ्यासक मायकल पिल्सबरी यांनी काढले आहे. ‘चीनकडून सध्या ‘बेल्ट अॅण्ड रोड’ योजनेचे काम जोरात सुरु आहे. मात्र या योजनेला विरोध करण्याचे धाडस जगात फक्त मोदींनी दाखवले आहे.’, असे पिल्सबरी म्हणाले. चीनच्या या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल अमेरिकेने मौन बाळगले असल्याचेही त्यांनी म्हटले. पिल्सबरी अमेरिकेतील प्रतिष्ठित थिंक टँक असलेल्या ‘हडसन इन्स्टिट्यूट’च्या चीनबद्दलच्या धोरणविषयक विभागाचे संचालक आहेत.
विशेष म्हणजे पिल्सबरी यांनी अमेरिकेच्या खासदारांसमोर बोलताना मोदींचे तोंडभरुन कौतुक केले. ‘मोदी आणि त्यांच्या टीमने चीनचे अध्यक्ष शी जिंनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासमोर उभे राहण्याचे धाडस दाखवले आहे,’ असे त्यांनी म्हटले. ‘चीनचा हा प्रकल्प भारताच्या सार्वभौमत्वासाठी धोकादायक असल्याने भारताने याबद्दल ठोस भूमिका घेतली असावी,’ असेही ते म्हणाले. चीनच्या प्रकल्पाबद्दल अमेरिकेची भूमिका अतिशय मवाळ असल्याचे स्पष्ट मतही त्यांनी मांडले.
चीन सरकारकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेटला जात असताना अमेरिकन सरकार मात्र गप्पच आहे, अशा शब्दांमध्ये पिल्सबरी यांनी ट्रम्प प्रशासनावर निशाणा साधला. ‘बेल्ट अॅण्ड रोड प्रकल्पाची सुरुवात ५ वर्षांपूर्वी झाली आहे. आधीचा काळ सोडल्यास, अमेरिकन सरकार याबद्दल शांतच आहे,’ असे ते म्हणाले. मात्र पँटागॉनचे माजी अधिकारी पिल्सबरी यांनी इंडो-पॅसिफिक धोरणासाठी ट्रम्प प्रशासनाचे कौतुक केले. ‘ट्रम्प प्रशासन आणि खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांमध्ये ‘मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक’ भागाबद्दल ५० पेक्षाही अधिक वेळा बोलले आहेत,’ असे पिल्सबरी यांनी म्हटले.
‘चीन त्यांच्या प्रकल्पाबद्दल अतिशय आक्रमक आहे. हा प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न केल्यास चीन संतप्त होऊ शकतो,’ असे पिल्सबरी म्हणाले. ‘बेल्ट अॅण्ड रोड’ ही चीनची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या माध्यमातून जगातील इतर भागांना जोडण्याचा चीनचा प्रयत्न आहे. ‘इकॉनॉमिक कॉरिडर’ तयार करुन व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने ‘बेल्ट अॅण्ड रोड’ची उभारणी सुरु आहे.