पीटीआय, मॉस्को

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. यात उभय देशांची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली, तसेच युक्रेन पेचावरही विचारविनिमय झाला, असे रशिया सरकारतर्फे सांगण्यात आले.

येत्या ४ जुलै रोजी शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) आभासी शिखर परिषद होणार असून त्याचे यजमानपद भारताकडे आहे. त्याआधी पुतिन आणि मोदी यांच्यात ही चर्चा झाली.क्रेमलिनतर्फे सांगण्यात आले की, ही चर्चा सकारात्मक आणि अर्थपूर्ण ठरली. द्विपक्षीय धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच उभय बाजूने संपर्क वाढविण्यावर चर्चेत भर देण्यात आला. युक्रेनसभोवतालच्या प्रदेशांतील स्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. विशेष लष्करी क्षेत्रातील सद्यस्थितीची माहिती पुतिन यांनी मोदी यांना दिली. हा पेच राजनैतिक आणि राजकीय चर्चेतून सोडविण्यास युक्रेनने साफ नकार दिला आहे, असे त्यांनी मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले, असे क्रेमलिनच्या निवेदनात म्हटले आहे.

हे युद्ध गतवर्षीच्या फेब्रुवारीपासून सुरू आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या चढाईचा भारताने अद्याप निषेध केलेला नाही. हा प्रश्न चर्चेतून राजनैतिक मार्गाने सोडविला पाहिजे, अशी भारताची दीर्घकाळपासूनची भूमिका आहे.शांघाय सहकार्य संघटना तसेच जी २० परिषदांमधील सहकार्याबाबतही उभय नेत्यांनी संवाद साधला.

बंडखोरीविरोधात मोदींचा पाठिंबा

क्रेमलिनच्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवडय़ात वॅग्नेरच्या खासगी सैनिकांनी अल्पकाळासाठी केलेल्या बंडाविरोधात रशियाने केलेल्या कारवाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला आहे. २४ जूनच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी रशियाच्या सरकारने केलेल्या उपाययोजना मोदी यांनी समजून घेतल्या आणि त्याला पाठिंबा दिला.