Mohammed Nizamuddin Was Shot Dead By Telangana Police: तेलंगणातील ३२ वर्षीय मोहम्मद निजामुद्दीन या विद्यार्थ्याने कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे त्याच्या रूममेटवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप असल्याने पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडली असून, त्याच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती दोन आठवड्यांनंतर कळाली.
निजामुद्दीनचे वडील, निवृत्त शिक्षक हुसनुद्दीन यांनी सांगितले की, १८ सप्टेंबर रोजी कर्नाटकातील रायचूर येथील त्यांच्या मुलाच्या मित्राद्वारे, त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
दरम्यान, कॅलिफोर्निया पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेलंगणातील महबूबनगर येथील मोहम्मद निजामुद्दीन याला ३ सप्टेंबर रोजी सांता क्लारा येथील त्याच्या राहत्या घरी चाकूने सापडल्यानंतर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. तो त्याच्या रूममेटला मारहाण करताना आढळला, त्याने केलेल्या मारहाणीमुळे रूममेटला अनेक जखमा झाल्या होत्या.
पोलिसांनी सांगितले की, घरात चाकूहल्ल्याच्या घटनेबद्दल ९११ वर कॉल आला होता. निजामुद्दीन आणि त्याच्या रूममेटमध्ये कथित वाद वाढला होता, ज्यामुळे हल्ला झाला. आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर संशयितावर गोळीबार केला. संशयिताला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले जिथे नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले”, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, निजामुद्दीनच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, गोळी लागण्यापूर्वी त्यानेच पोलिसांना मदतीसाठी बोलावले होते.
निजामुद्दीनने फ्लोरिडाच्या एका महाविद्यालयात संगणक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते आणि तो कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील एका टेक फर्ममध्ये काम करत होता. तो एक शांत आणि धार्मिक व्यक्ती होता आणि त्याने वांशिक छळ, वेतनात फसवणूक आणि नोकरीवरून चुकीच्या पद्धतीने काढून टाकल्याच्या तक्रारीही सार्वजनिकरित्या केल्या होत्या, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या लिंक्डइन पोस्टकडेही लक्ष वेधले आबे ज्यामध्ये म्हटले होते, “मी वांशिक द्वेष, वांशिक भेदभाव, वांशिक छळ, वेतन-फसवणूक, चुकीच्या पद्धतीने कामावारून काढून टाकणे आणि न्यायाच्या अडथळ्याचा बळी ठरलो आहे. पुरे झाले, श्वेत वर्चस्व/वर्णद्वेषी श्वेत अमेरिकन मानसिकता संपली पाहिजे.”
कुटुंबीयांनी आरोपांची आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सांता क्लारा येथील रुग्णालयात औपचारिकतेसाठी ठेवण्यात आलेले त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाची मदत मागितली आहे.