Bengaluru Police Slapped Biker Mohandas Pai Shared Video: नियमित वाहतूक तपासणीदरम्यान बंगळुरूतील पोलीस कर्मचाऱ्याने एका मोटारसायकलस्वाराला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या घटनेवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध पोलीस कर्मचारी पीडित व्यक्तीला मारहाण करत असल्याच्या या व्हिडिओमुळे पोलिसांच्या शिस्तीवर आणि अधिकाराच्या गैरवापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रसिद्ध उद्योजक आणि आरिन कॅपिटलचे अध्यक्ष मोहनदास पै यांनी एक्सवर एका पोस्टच्या माध्यमातून या पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये मोहनदास पै म्हणाले की, “आपले बंगळुरू पोलीस या प्रकरणी कारवाई करतील का? पोलीस कर्मचारी एखाद्या नागरिकाला कानशिलात मारूच कसा शकतो? आम्ही गुलाम आहोत की आपल्या शहरातील नागरिक? मंत्री डॉ. परमेश्वर, कृपया या प्रकरणाची दखल घ्या. हे अस्वीकार्य आहे. जनतेची सेवा करण्याची शपथ घेतलेले कर्नाटकचे पोलीस महासंचालक आणि आपले मुख्यमंत्री नागरिकांचे रक्षण करतील का?”
यानंतर मोहनदास पै यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ते म्हणाले की, “यात सत्तेचा स्पष्ट गैरवापर दिसत आहे.” पुढे त्यांनी असा प्रश्नही केला की, “कायदा खरोखरच सर्वांसाठी समान आहे का?” याचबरोबर मोहनदास पै यांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, असे आवाहनही सरकारला केले.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलीस दलाची जबाबदारी, शिस्त आणि पारदर्शकता याबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक युजर्सनी मोहनदास पै यांच्या मागणीला पाठींबा देत, “अंतर्गत कारवाई पुरेशी आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला.
एका युजरने डीसीपी साउथ ट्रॅफिकची एक्स पोस्ट शेअर करत, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे. पण यावर काही युजर्सनी पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याचा पुरावा मागितला आणि अधिकृत आदेश किंवा एफआयआर सार्वजनिक करण्याची मागणी केली.
“ते म्हणत आहेत की पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे, पण पुरावा कुठे आहे? ही फक्त जनतेचा राग शांत करण्याची एक युक्ती आहे,” असे एका युजरने लिहिले.
बंगळुरू शहर पोलीस आणि डीसीपी साउथ ट्रॅफिक यांनी सोशल मीडियाद्वारे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे. पण अनेक नागरिकांचा यावर विश्वास नाही. पोलिसांनी अधिकृत निलंबन आदेश किंवा एफआयआर प्रसिद्ध करावा, अशी त्यांची मागणी आहे.