योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिन्याच्या कार्यकर्त्यांनी मोरल पोलिसिंग करत एका प्रेमी युगुलाला त्रास दिल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी २००१ साली सुरू केलेल्या युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी एका जोडप्याला अपमानित केले. एका इमारतीमधील खोलीमध्ये एक जोडपे बसले होते. मुलगा हा मुस्लिम होता तर मुलगी हिंदू होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तुम्ही कोण आहात कुठून आलात तुमच्या आई-वडिलांचे नाव काय असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. इतर अनेक प्रश्न विचारुन त्यांनी युगुलाला त्रस्त केले. तुम्ही लग्न करणार आहात का? केल्यास मुलीचे धर्मपरिवर्तन करणार आहात का असे प्रश्न विचारण्यात आले.

आम्ही जेव्हा रुमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना आम्ही संशयास्पद हालचाली करताना पाहिले. हे लोक भाड्याने रुम घेऊन गैरकृत्य करतात असे युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले. रुम भाड्याने देण्याआधी ती रुम कोण वापरणार आहे याची शहानिशा करुन घेणे आवश्यक नाही असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणात पोलिसांनी लक्ष द्यायला हवे असे हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले. हा प्रकार घडल्यानंतर मुलाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांमुळे आपणास मनस्ताप सहन करावा असे त्याने पोलिसांना सांगितले. योगी आदित्यनाथ यांनी २००१ साली हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली.

गेल्या १५-१६ वर्षांमध्ये या वाहिनीच्या माध्यमातून हिंदू धर्म सोडून गेलेल्या २५,००० जणांची घरवापसी केल्याचा दावा हिंदू युवा वाहिनी करते. योगी आदित्यनाथ हे सत्तेमध्ये येण्याआधीपासूनच युवा वाहिनी राज्याचा अनेक भागात कार्यरत आहे. तथाकथित लव्ह जिहाद विरोधात लढा देणे आणि घरवापसी करणे ही युवा वाहिनीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत असे म्हटले जाते. देशात मोरल पोलिसिंगच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची खंत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. कुणी कुणासोबत राहावे हा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सामाजिक कार्यकर्त्याने म्हटले. कुठे गोरक्षणाच्या नावाने दमदाटी तर कुठे लव्ह जिहादचे निमित्त करुन सामान्य जनतेला त्रास देण्याच्या घटनेत वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.