अरुणाचल-पूर्वचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तिपर गोव यांनी अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतीय सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या चिनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा तिपर यांनी केला आहे.

चीनचे अधिक सैनिक जखमी

गेल्या शुक्रवारी (९ डिसेंबर) झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या विषयावरुन विरोधकांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशाला अंधारात ठेवल्याचा आरोप करत टीका केली आहे. या प्रकरणावरुन आता वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच दुसरीकडे येथील स्थानिक खासदार असलेल्या तिपर यांनी, “भारतीय सैनिकांपैकी काहीजण जखमी झाल्याचं मी ऐकलं मात्र पीएलएचे (पीपल्स लिबरेशन आर्मी) अधिक सैनिक जखमी झाले आहेत,” असा दावा केला आहे.

जशास तसं उत्तर देणार

चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने केलेल्या या कृत्याचा निषेध करताना भाजपाच्या खासदाराने, “अशाप्रकारच्या घटना वारंवार होत असल्याने भारत आणि चीनदरम्यानचे संबंध खराब होत आहेत. मी माझ्यावतीने पीएलएच्या या कृत्याचा निषेध करतो. भारतीय सीमेवरील सैनिक एक इंचही मागे हटणार नाहीत. जेव्हा जेव्हा चीन अशा कुरापत्या करेल तेव्हा भारतीय सैन्य त्यांना जशास तसं उत्तर देईल,” असाही विश्वास व्यक्त केला.

नक्की वाचा >> अरुणाचलमध्ये भारत-चीन लष्करी संघर्ष: “मोदींनी स्वत:ची प्रतिमा वाचवण्यासाठी देशाला धोक्यात टाकलं, LAC पासून १५ ते १८ किमी आतपर्यंत…”

६०० चिनी सैनिकांशी चकमक

९ डिसेंबर रोजी भारतीय जवानांची तवांगच्या यांगत्से सीमाभागात ६०० चिनी सैनिकांशी चकमक झाली, असे सूत्रांनी सांगितले. चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलातील अधिकाऱ्याने दुजोरा दिला असला तरी त्याबाबतचा तपशील देण्यास मात्र त्याने नकार दिला. चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाले आहेत, असा दावा या अधिकाऱ्याने केला. चकमकीत काही भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते.

चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ

चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमधील पूर्व लडाखमध्ये २०२०मध्ये झालेल्या चकमकीपूर्वी, चिनी तळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून खूप दूर होते. परंतु त्यानंतर मात्र चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ सरकण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांत चीनने पश्चिम क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पूर्व आणि मध्य क्षेत्रांमध्ये चीनच्या हालचाली वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी याआधी सांगितले होते. भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पश्चिम (लडाख), मध्य (हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड), सिक्कीम आणि पूर्व (अरुणाचल प्रदेश) क्षेत्रात विभागली गेली आहे.

नक्की वाचा >> अरुणाचलमध्ये भारत-चीन संघर्ष: “चीनला उत्तर देण्यास भारतीय लष्कर समर्थ, मात्र मोदींच्या कमकुवत…”; असदुद्दीन ओवेसी संतापले

जवानांवर गुवाहाटीत उपचार?

चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाल्याचा दावा एका लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. मात्र या चकमकीत भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर गुवाहाटीत उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चकमक झाली तेव्हा ६०० चिनी सैनिक होते, अशीही माहिती आहे.

गलवान नंतरची पहिलीच घटना

लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. गलवान चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्यात आतापर्यंत लष्करी पातळीवर द्विपक्षीय चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.

तवांग क्षेत्रातील सज्जता..

चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन तवांग सीमा क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक (एलएसी) शस्त्रास्त्र सज्जता आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर दळणवळणाच्या अद्ययावतीकरणासह अप्पर दिबांग खोऱ्यात चिनी सैनिकांवर पाळतही ठेवण्यात येते.