Madhya Pradesh : भ्रष्टाचाराच्या विरोधात देशात अनेकदा आवाज उठवला जातो. मात्र, तरीही प्रशासनातील भ्रष्टाचार हा काही कमी होताना दिसत नाही. आता मध्य प्रदेशातील एका महापालिकेत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. एका तरुणाने स्पीकर फोनवर ठेवत कुणाला किती लाच द्यायची? याचा रेट थेट फोनद्वारे महापौरांना ऐकवला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशातील एका तरुणाने ११ नोव्हेंबर रोजी एका महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आणलं. थेट महापौरांसमोरच फोन केला आणि फोनवरच इमारतींच्या मंजुरीसाठी किती पैसे मागितले जात आहेत हे ऐकवलं. ही घटना मोरेना पालिकेत घडली असल्याचं वृत्त एनडीटीव्हीच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलं आहे.

वृत्तानुसार, बांधकाम परवाना मिळवण्यासाठी अनेक दिवसांपासून महापालिकेच्या कार्यालयात येत असलेल्या पंकज नामक तरुणाने असा दावा केला की एक ब्रोकर (मध्यस्थ व्यक्ती) पालिका अधिकाऱ्यांच्या नावाने वारंवार पैसे मागत आहे. असं सांगत या तरुणाने थेट महापौरांसमोर त्या ब्रोकरला फोन केला आणि लाचखोरीचा पर्दाफाश झाला.

स्पीकर फोनवर कॉल होताच ब्रोकरने फाईल क्लीअर करण्यासाठी किती रक्कम द्यावी लागते? याची माहिती देण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर त्या संभाषणात काही अधिकाऱ्यांची आणि अपेक्षित रकमेची थेट माहिती ब्रोकरने सांगितली. ते ऐकून महापौरांनाही धक्का बसला. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

व्हिडीओमधील संभाषणात काय?

पंकजने फोन केला आणि विचारलं की, “आता मला काय करावं लागेल? ३ लाख रुपये द्यावे लागतील का?” त्यावर ब्रोकरने उत्तर दिलं की, “पीडीएफ बनवा, ते मला पाठवा आणि फोनपेद्वारे ३,००० रुपये ट्रान्सफर करा.”, त्यानंतर पंकजने म्हटलं की, “अजून किती लागतील ते मला सांगा.” त्यावर ब्रोकरने उत्तर दिलं की, “मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे.”

पंकजने पुढं म्हटलं की, “१०,००० रुपयांपेक्षा कमी नाही का?” त्यावर ब्रोकरने म्हटलं की, “नाही कमी होणार नाही.” मग पंकजने म्हटलं की, “मी ४,००० रुपये कोणाला देऊ?” ब्रोकरने सांगितलं की, एखाद्या व्यक्तीकडे द्यावे लागतील असं म्हणत अजयकडे १,००० रुपये दे असं म्हटलं. दरम्यान, हे संभाषण ऐकून त्या पालिकेच्या महापौरांनाही धक्का बसला.