Most Nuclear Weapons Countries: इस्रायल व इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या जगात पुन्हा एकदा अण्वस्त्रांची चर्चा होऊ लागली आहे. इस्रायलनं इराणमधील आण्विक तळांवर व लष्करी तळांवर हल्ले चढवले आहेत. प्रत्युत्तरादाखल इराणनंदेखील इस्रायलच्या हद्दीत हवाई हल्ले चढवले आहेत. इराण अण्वस्त्र बाळगूच शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली असून जी-७ राष्ट्रांनीही या युद्धात आपलं समर्थन इस्रायलच्या पाठिशी उभं केलं आहे. या पार्श्वभूमीवर जगात आजघडीला किती अण्वस्त्रं आहेत? कोणत्या देशाकडे सर्वाधिक तर कोणत्या देशाकडे सर्वात कमी आहेत? यासंदर्भात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर समोर आली यादी
मध्य-पूर्व आशियात दोन्ही देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर SIPRI अर्थात Stolkholm International Peace Research Institute च्या एका अहवालाची चर्चा होऊ लागली आहे. या संस्थेच्या इयरबुक २०२५ मध्ये जगभरात किती देशांकडे अण्वस्त्रे आहेत? कुणाकडे किती अण्वस्त्रे आहेत? याची आकडेवारी दिली आहे. यानुसार, आजघडीला जगभरात अधिकृतरीत्या एकूण ९ देशांकडे अण्वस्त्रे असून या देशांनी २०२४ या वर्षात जोरकसपणे न्यूक्लिअर मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम राबवले असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यात सध्या त्यांच्याकडे असणाऱ्या अण्वस्त्रांची ताकद वाढवणं आणि त्यांच्या सुधारित आवृत्तींचा ताफ्यात समावेश करणं अशा बाबींवर या देशांनी काम केल्याचं म्हटलं आहे.
काय आहे SIPRI?
या संस्थेकडून दरवर्षी जगभरातील देशांकडे असणाऱ्या शस्त्रास्त्रांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार शस्त्रास्त्रे तयार करणे, शस्त्रास्त्रे नष्ट करणे आणि त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा अंदाज घेणं या बाबींवर वेगवेगळ्या राष्ट्रांकडून कशा पद्धतीने काम होत आहे, याचा अहवाल सिप्रिकडून तयार केला जातो. या अहवालानुसार आजघडीला जगभरातल्या एकूण ९ देशांच्या नावावर एकूण १२ हजार २४१ अण्वस्त्रांची नोंद आहे. त्यात निरनिराळ्या साठा-सुविधांमधील जिवंत अण्वस्त्रांसोबतच त्या त्या देशांनी कालपरत्वे ताफ्यातून निवृत्त केलेल्या पण अद्याप नष्ट न केलेल्या अण्वस्त्रांचा समावेश आहे.
पाकिस्तानकडे किती अण्वस्त्रे?
सिप्रिनं समाविष्ट केलेल्या आकडेवारीनुसार अण्वस्त्रधारी देशांमध्ये भारत व पाकिस्तानचाही समावेश आहे. त्यात पाकिस्तानपेक्षा भारताकडे जास्त अण्वस्त्रे असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जानेवारी २०२५ च्या या आकडेवारीनुसार, भारताकडे अंदाजे १८० अण्वस्त्रे असून पाकिस्तानकडे अंदाजे १७० अण्वस्त्रे आहेत.
क्रमांक | देश | अण्वस्त्रे |
१ | रशिया | ५४५९ |
२ | अमेरिका | ५१७७ |
३ | चीन | ६०० |
४ | फ्रान्स | २९० |
५ | ब्रिटन | २२५ |
६ | भारत | २८० |
७ | पाकिस्तान | १७० |
८ | इस्रायल | ९० |
९ | उत्तर कोरिया | ५० |
दरम्यान, भारत व पाकिस्तान या दोन्ही आशियाई देशांपेक्षा चीनकडे मोठ्या संख्येनं अण्वस्त्र आहेत. जानेवारी २०२५ मध्ये चीनकडे अंदाजे ६०० अण्वस्त्रे असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे
९ देशांच्या आकडेवारीनुसार रशियाकडे सर्वाधिक ५ हजार ४५९ अण्वस्त्रे असल्याची माहिती या आकडेवारीवरून दिसून येत आहे. रशिया व अमेरिका या दोन देशांकडे मिळून जगभरातल्या एकूण अण्वस्त्रांपैकी ९० टक्के अण्वस्त्रे आहेत.
इतरही काही देशांकडे अण्वस्त्रे तयार करण्याची क्षमता
दरम्यान, या ९ देशांव्यतिरिक्त जगभरातल्या इतरही काही देशांकडे अण्वस्त्रे तयार करण्याची क्षमता आहे. यात पूर्व आशिया, युरोप आणि मध्य-पूर्व या भागातील देशांचा समावेश आहे.