महाराष्ट्रात व देशपातळीवर इतर राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा चर्चेत आला. अनेक आजी-माजी आमदारांनी पक्ष बदलले, काहींनी पूर्ण गटच सोबत नेऊन पक्षात फूट पाडली तर काही ठिकाणी सरकारं कोसळली. महाराष्ट्रातही या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका विद्यमान आमदारानं पक्षाला रामराम ठोकला असून पक्षात आलेल्या नव्या सदस्यांमुळे आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील आमदार विरेंद्र रघुवंशी यांनी एक पत्र जाहीर करून पक्ष सोडत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
अवघ्या काही महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्याआधीच भाजपातील अंतर्गत नाराजी बाहेर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार विरेंद्र रघुवंशी यांनी मध्य प्रदेश भाजपा अध्यक्ष विष्णु दत्त शर्मा यांना पत्र पाठवून आपण पक्ष सोडत असल्याचं कळवलं आहे. तसेच, हे पत्र त्यांनी माध्यमांमध्ये जाहीर करून पक्षातून बाहेर पडत असल्याची माहिती दिली आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी या निर्णयामागची कारणंही नमूद केली आहेत.
काय म्हणणं आहे रघुवंशी यांचं?
कोलारस विधानसभा मतदारसंघाचे आमदार असणारे विरेंद्र रघुवंशी यांनी पक्षात आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली आहे. “माझ्या वेदना गेल्या पाच वर्षांपासून मी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह इतर वरीष्ठ नेत्यांना कळवल्या आहेत. पण त्यांनी माझ्या तक्रारींची कोणतीही दखल घेतली नाही”, असं रघुवंशी यांचं म्हणणं आहे.
अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेचे निलंबन रद्द होण्याची शक्यता, विशेषाधिकार समितीने घेतला मोठा निर्णय!
“मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर-चंबळ विभागामध्ये पक्षात आलेल्या नव्या सदस्यांमुळे माझ्यासारख्या जुन्या पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही पूर्ण निष्ठेनं पक्षाचं काम केलं होतं. तरीही आमच्याबाबत असा प्रकार घडला”, असंही रघुवंशी यांनी यावेळी नमूद केलं.
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नेमणुका
दरम्यान, रघुवंशी यांनी पक्षाच्या राज्यातील वरीष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या कोलारस मतदारसंघात जाणूनबुजून भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जेणेकरून मी करत असलेल्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण व्हावेत आणि माझ्या कार्यकर्त्यांना मनस्ताप सहन करायला लागावा”, असा दावा विरेंद्र रघुवंशी यांनी केला आहे.
ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यावर हल्लाबोल
विरेंद्र रघुवंशी यांनी राजीनामा देताना दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यावरही आगपाखड केली. “राज्यातलं काँग्रेस सरकार २०२०मध्ये कोसळलं तेव्हा सिंदिया म्हणाले होते की त्या सरकारनं शेतकऱ्यांचं २ लाखांचं कर्ज माफ केलेलं नाही. मात्र, राज्यात भाजपाचं सरकार आल्यापासून सिंदिया कर्जमाफीवर बोलायलाही तयार नाहीत”, असं रघुवंशी यांनी नमूद केलं.