Mohan Delkar खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. चीफ जस्टिस भूषण रामकृष्ण आणि जस्टिस एन. वी. अंजारिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा बॉम्बे उच्च न्यायलयाचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. बॉम्बे हायकोर्टाने दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा ९ जणांवर जो आरोप होता आणि जे आरोपपत्र दाखल केलं होतं ते रद्द केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी २०२१ मध्ये नऊ जणांच्या विरोधात आरोपपत्र

मोहन डेलकर यांचा मृतदेह २२ फेब्रुवारीच्या दिवशी मरिन ड्राईव्ह या ठिकाणी एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात नऊ जणांच्या विरोधात FIR केला होता. त्यात हा आरोप करण्यात आला होता की या नऊ जणांनी मोहन डेलकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरोपपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय मान्य नसल्याने काही याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयच योग्य असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं?

८ सप्टेंबर २०२२ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या जस्टिस प्रसन्न वराळे आणि जस्टिस श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने नऊ जणांवर झालेले आरोप निराधार आहेत असं म्हटलं होतं. कायद्याचा दुरुपयोग करुन ही FIR दाखल झाली आहे असं निरीक्षण त्यावेळी न्यायालयाने नोंदवलं होतं.

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण काय?

फेब्रुवारी २०२१ या महिन्यात दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५८) यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मोहन यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. गुजराती भाषेतील चिठ्ठीत काही राजकीय पुढारी, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा उल्लेख होता अशी माहिती समोर आली होती. नरिमन पॉईंट येथील ‘सी ग्रीन साऊथ’ हॉटेलच्या पाचव्या माळ्यावरील खोलीत डेलकर हे दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मोहन डेलकर २१ फेब्रुवारी २०२१ च्या रात्री हॉटेलमध्ये आले. २२ फेब्रुवारी २०२१ ला त्यांच्या आत्महत्येची बाब उघड झाली तेव्हा ते खोलीत एकटेच होते, अशी माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. मोहन यांनी सोबत आणलेल्या शालीचा गळफास घेण्यासाठी वापर केला होता.