काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संसदेच्या अधिवेशनात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या विधानानंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. यादरम्यान भाजपाच्या खासदार स्मृती इराणी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामध्ये शाब्दिक चकमच उडाली. ‘डोंट टॉक टू मी’ असं म्हणत सोनिया गांधींनी स्मृती इराणींशी बोलण्यास नकार दिल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे. मात्र, सभागृहात नेमके काय घडले याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळेंचे ट्वीट
लोकसभेत दुर्दैवी दृश्य पाहायला मिळाले. सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून मोठ्याने घोषणा करण्यात येत होत्या. सोनिया गांधींविरोधातील या घोषणा ऐकूण मला धक्का बसला. आपण सर्वांनी आपल्या घराची (देशाची) जबाबदारी घेतली पाहिजे. देशाची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न आपण करायला हावा, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केला. चौधरी यांच्या वादग्रस्त विधानानंतर संसदेत चांगलाच गदारोळ माजला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यांनी केली. या मागणीनंतर सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. कामकाज स्थगित झाल्यानंतर भाजपाचे खासदार सोनिया गांधींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा करत होते.

हेही वाचा- Smriti Irani Defamation Case: २४ तासात ट्वीट डिलीट करा, अन्यथा.., हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना फटकारलं

चौधरी यांचे सभापतींना विनंती पत्र

अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत आज एक निवेदन जारी केले आहे. ‘मी राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही. ती फक्त एक चूक होती. जर राष्ट्रपती नाराज झाले असतील तर मी त्यांची वैयक्तिक भेट घेईन आणि माफी मागेन. त्यांना हवे असल्यास ते मला फाशी देऊ शकतात. मी शिक्षा भोगायला तयार आहे पण या सगळ्यात सोनिया गांधींना का ओढले जात आहे? असा सवालही त्यांनी केला. चौधरी यांनी सभापती ओम बिर्ला यांना सभागृहात स्पष्टीकरण देण्याची संधी देण्याची विनंती केली आहे. याबाबत त्यांनी सभापतींना पत्र लिहिले आहे.

हेही वाचा- ‘निलंबित खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर चिकन तंदुरी खाल्ली’; भाजपाचा आरोप

त्यांनी आधीच माफी मागितली आहे, सोनिया गांधीचे स्पष्टीकरण

लोकसभेतील गदारोळानंतर अधीर रंजन यांना माफी मागायला सांगणार का, असा प्रश्न सोनिया गांधींना माध्यमांनी विचारला होता. यावर सोनिया गांधी म्हणाल्या की, त्यांनी आधीच माफी मागितली आहे. दरम्यान, या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यालयात वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरीही उपस्थित होते.

सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित

कालच्या या गोंधळाचे पडसाद आजही दिसून आले. कामकाजाच्या सुरूवातीला सभागृहात गोंधळ झाल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते परंतु पुन्हा कामकाजास सुरुवात केल्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला. परिणामी लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केले आहे.