scorecardresearch

‘निलंबित खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर चिकन तंदुरी खाल्ली’; भाजपाचा आरोप

निलंबित करण्यात आलेल्या याखासदारांच्या जेवणाच्या सोयीसाठी विरोधी पक्षांनी पुढाकार घेतला आहे.

Suspended opposition MPs sit on dharna in front of Gandhi statue
निलंबित विरोधी खासदार गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करताना (फोटो एनआय ट्वीटर)

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचे सभागृहाच्या आवारात आंदोलन सुरु आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर करण्यात येणाऱ्या या अंदोलनादरम्यान निलंबित खासदारांनी चिकन तंदूरी खाल्ली असल्याचा आरोप भाजपा नेते शहजाद पूनावाला (Shehzad Poonawalla) यांनी केला आहे. ‘हे आंदोलन आहे की तमाशा’, असा सवाल पूनावाला यांनी उपस्थित केला आहे.

निलंबन कारवाईविरोधात उपोषण

सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या २० खासदारांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईच्या विरोधात निलंबित खासदारांकडून बुधवारपासून उपोषण करण्यात येत आहे. जवळजवळ ५० तास या खासदारांकडून उपोषण करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान या खासदारांच्या जेवणाची व्यवस्था विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. डोस्यापासून मांसाहारी पदार्थांपर्यंत निलंबित खासदार ताव मारत आहेत. महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर सुरु असलेल्या या आंदोलनात निलंबित खासदारांनी चिकन तंदुरी खाल्ली असल्याचा आरोप भाजपा नेते शहजाद पूनावाला यांनी केला आहे.

हेही वाचा- कर्नाटकमध्ये भाजपा कार्यकर्त्यानंतर आणखी एका तरुणाची हत्या, १४४ कलम लागू

निलंबित खासदारांच्या जेवणासाठी वेळापत्रक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रमुक खासदार तिरुची सिवा यांनी निलंबित खासदारांसाठी इडली-सांबारच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती. तर, द्रमुकने दुपारच्या जेवणासाठी दही भाताची आणि तृणमूल काँग्रेसने रात्रीच्या जेवणासाठी रोटी, डाळ, पनीर आणि चिकन तंदूरीची व्यवस्था केली होती. गुरुवारी निलंबित खासदारांच्या न्यारीची जबाबदारी द्रमुकने घेतली होती. तर टीआरएसने दुपारच्या जेवणाची आणि आम आदमी पार्टीने रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती.

हेही वाचा- निवडणुका तूर्त ओबीसी आरक्षणाविनाच ; ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत नव्याने अधिसूचना काढल्यास अवमान कारवाईचा इशारा

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची निलंबित खासदारांना विनंती

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहातील निलंबित खासदारांच्या ५० तासांच्या उपोषणावर टीका केली आहे. चूक करणाऱ्यांनी चूक मान्य करून माफी मागितली तर ते मोठे होतात. पण त्यांनी एवढा उद्धटपणा दाखवला तर आपण काय करणार? आम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आंदोलन करा, पण संध्याकाळी घरी जा, अशी विनंती जोशी यांनी निलंबित खासदारांना केली होती. सरकार चर्चेसाठी तयार असताना तुम्ही केलेले वर्तन जनता पाहत आहे. हे योग्य नसल्याचेही ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2022 at 11:34 IST
ताज्या बातम्या