तीनदा आयपीएलचा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. वर्ष २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केलाय. त्यामुळे यावेळी आयपीएलमध्ये चेन्नईचे खेळाडू नवीन जर्सीत दिसतील. चेन्नईच्या नवीन जर्सीमध्ये भारताच्या सशस्त्र दलाचा सन्मान म्हणून ‘कॅमोफ्लॉज’ देखील आहे.
चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे, पण खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वरती तीन स्टार आहेत, 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकल्याचं हे तीन स्टार दर्शवतात. चेन्नई सुपर किंग्सने जर्सी अनावरण करतानाचा धोनीचा एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली.
“सशस्त्र दलाच्या महत्त्वपूर्ण आणि निःस्वार्थ भूमिकेबद्दल जागरूकता वाढविण्याचा मार्ग आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शोधत होतो. हा कॅमोफ्लॉज त्यांच्यासाठीच आहे…तेच आपले खरे नायक आहेत”, असं सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एस. विश्वनाथन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं.
Thala Dharisanam! #WearOnWhistleOn with the all new #Yellove! #WhistlePodu
– https://t.co/qS3ZqqhgGe pic.twitter.com/Gpyu27aZfL
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2021
दरम्यान, 9 एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलला सुरूवात होणार आहे. तर 30 मे रोजी फायनल खेळवली जाईल. गेल्यावर्षी करोना व्हायरसमुळे युएईमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, यंदा पुन्हा एकदा आयपीएलचं भारतात पुनरागमन होणार आहे.