Bangladesh Muhammad Yunus : बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झालं. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठी पाऊले उचलली आहेत. ज्यामध्ये देशातील अराजकता आणि हिंसाचार नियंत्रणात आणण्यासह आगामी निवडणुका घेण्याच्या मुद्यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.

मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर आता बांगलादेश अंतरिम सरकारला मात्र नमतं घ्यावं लागल्याची माहिती समोर आली आहे. युनूस यांच्या सरकारने नुकताच प्राथमिक शाळांमध्ये संगीत आणि नृत्य शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाला संपूर्ण देशभरात बांगलादेशी इस्लामवाद्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पुन्हा एकदा देशात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसताच मोहम्मद युनूस सरकारने नमतं घेत संबंधित शिक्षक भरती रद्द केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

प्राथमिक शाळांमध्ये संगीत आणि नृत्य शिक्षकांची भरती करण्याच्या निर्णयाला बांगलादेशी इस्लामवाद्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला होता. त्यानंतर अखेर बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलं की, सरकारी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांसाठी नव्याने निर्माण केलेली पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच शारीरिक शिक्षण विभागातील शिक्षकांचे पदेही मंत्रालयाने रद्द केले असल्याचं सांगितलं आहे.

बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयातील अधिकारी मसूद अख्तर खान यांनी म्हटलं की, “गेल्या ऑगस्टमध्ये जारी केलेल्या नियमांमध्ये चार श्रेणीतील पदे होती. मात्र, दुरुस्तीमध्ये दोन श्रेणींचा समावेश करण्यात आला. संगीत आणि शारीरिक शिक्षणासाठी सहाय्यक शिक्षकांची पदे नवीन नियमांमध्ये नाहीत.” कोणत्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला असता त्यावर भाष्य करण्यास अख्तर खान यांनी नकार दिला.

दरम्यान, युनूस प्रशासनाने गेल्या काही दिवसांत अनेक निर्णयांमध्ये यू-टर्न घेतल्याची टीका देखील आता होत आहे. युनूस प्रशासन बांगलादेशी इस्लामवाद्यांच्या दबावापुढे झुकत असल्याची टीका युनूस यांच्यावर होत आहे.

“दिल्लीत मुक्तपणे राहतेय, पण घरी परतायला आवडेल”; शेख हसीना

बांगलादेशातील हिंसाचारानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देऊन देश सोडला होता. तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलेला आहे. शेख हसीना यांनी नुकतीच प्रतिक्रिया समोर आली होती. तेव्हा आपण दिल्लीत राहत आहोत, पण बांगलादेशात पुन्हा परतायला आवडेल अशी प्रतिक्रिया दिली होती. शेख हसीना यांनी म्हटलं होतं की, ‘दिल्लीत मुक्तपणे राहत आहे, पण घरी (बांगलादेशात) परतायला आवडेल. पण त्यांच्या पक्षाला वगळून झालेल्या निवडणुकांनंतर देशात स्थापन झालेल्या कोणत्याही सरकारच्या नेतृत्वाखाली आपण बांगलादेशात परतणार नाही. तसेच सध्या तरी आपली भारतातच राहण्याची योजना असल्याचं हसीना यांनी म्हटलं होतं.