सहा वर्षांनंतर लख्वी तुरुंगातून बाहेर

मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या १० बंदुकधाऱ्यांना पाकिस्तानमधील नियंत्रण कक्षातून मार्गदर्शन करणारा झकीर-उर-रहमान लख्वी हा सहा वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर शुक्रवारी तुरुंगातून बाहेर आला.

मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या १० बंदुकधाऱ्यांना पाकिस्तानमधील नियंत्रण कक्षातून मार्गदर्शन करणारा झकीर-उर-रहमान लख्वी हा सहा वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर शुक्रवारी तुरुंगातून बाहेर आला. लाहोर उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याची स्थानबद्धता रद्द ठरवून त्याच्या सुटकेचा आदेश दिला होता. ही सुटका ‘दुर्दैवी आणि निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया भारताने नोंदवली आहे.
मुंबईवरील २००८ सालच्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर असलेल्या लख्वीच्या सुटकेचा आदेश त्याच्या वकिलांनी शुक्रवारी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना सोपवला. यानंतर दुपारी १.४० वाजता रावळपिंडीतील आदियाला तुरुंगातून त्याची सुटका करण्यात आली. जमात-उद-दवा संघटनेचे समर्थक त्याच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर हजर होते. तुरुंगातून बाहेर येताच मोटारीत बसून लख्वी त्याच्या इस्लामाबादेतील निवासस्थानी रवाना झाला.
यापूर्वी, पाकिस्तान सरकारच्या कायदाविषयक चमूने लख्वीला पुन्हा गजाआड पाठवण्याच्या अनेक पर्यायांवर विचारविनिमय केला, मात्र त्याला पुन्हा स्थानबद्ध करण्याचे कुठलेही कायदेशीर कारण त्यांना मिळू शकले नाही. इस्लामाबाद आणि लाहोर उच्च न्यायालयांनी लख्वीची सार्वजनिक सुव्यवस्था आदेशान्वये केलेली स्थानबद्धता दोन वेळा रद्द ठरवली असल्यामुळे त्याला पुन्हा याच आदेशान्वये स्थानबद्ध करण्याचा पर्याय स्वीकारणे सरकारसाठी कठीण असल्याचे कायदा खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
इकडे, लाहोर उच्च न्यायालयाने लख्वीची स्थानबद्धता रद्द केल्यामुळे सरकारला त्याची सुटका करण्याशिवाय दुसरा कुठलाही ‘कायदेशीर पर्याय’ नव्हता, असे त्याचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले. सरकार किंवा अदियाला तुरुंगाचे अधिकारी यांना यावेळी न्यायालयाच्या आदेशाचा भंग करता आला नाही, असे ते म्हणाले.
२६ नोव्हेंबर २००८ला सुमारे ६० तास चाललेल्या, तसेच १६६ जणांचे बळी गेलेल्या व तीनशेहून अधिक लोक जखमी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी केल्याचा आरोप लख्वी व इतर सहा जणांवर ठेवण्यात आला होता. लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि जमात-उद-दवाचा प्रमुख हफीझ सईद याचा जवळचा नातेवाईक असलेल्या लख्वीला डिसेंबर २००८ मध्ये अटक करण्यात आली होती. २००९ सालापासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, कुख्यात दहशतवादी लख्वी याच्या सुटकेबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. भारताला पाकिस्तानसोबत बोलणी करायची आहेत, परंतु मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या लख्वीची सुटका ही ‘दुर्दैवी आणि निराशाजनक’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौ येथे पत्रकारांना सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai attack suspect lakhvi released on bail in pakistan