परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल व कुलगुरू सी. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाला दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात येत आहे. मात्र, आज शेवटचा दिवस असूनही उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामध्ये समाधानाची बाब इतकीच की विद्यापीठाकडून १५३ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कला शाखेच्या ७८, तंत्रज्ञान ४८ , विज्ञान १०, वाणिज्य ७ आणि व्यवस्थापन शाखेच्या १० परीक्षांच्या निकालाचा समावेश आहे. तसेच ९० टक्के उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्याचा दावाही विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ उर्वरित १० टक्के मूल्यांकन आजच्या दिवसात पूर्ण करू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कालच मुंबई विद्यापीठाकडून १० परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले होते.

पदवी परीक्षांना ४५ दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर न करणाऱ्या विद्यापीठाची ४ जुलै रोजी राज्यपालांनी चांगलीच कानउघाडणी केली होती. विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यत जाहीर करा, असे आदेश त्यांनी कुलगुरूंना दिले होते. त्या आदेशानंतर खडबडून जाग्या झालेल्या विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाकडे मूल्यांकनाच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर २४ ते २७ जुलै या काळात अध्यापनाचे काम बंद करून ३ हजार ९८ प्राध्यापकांना पूर्णवेळ मूल्यांकनाच्या कामासाठी जुंपले. यासाठी मुंबई विद्यापीठाची महाविद्यालये पूर्णवेळ मूल्यांकनासाठी आधी चार दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत आणखी वाढवण्यात आली. पण तरीही लाखो उत्तरपत्रिकांची तपासणी करणे शक्य झाले नाही. पूर्णवेळ मूल्यांकनाची मुदत पुढे वाढवून ३१ जुलैपर्यत करण्यात आली. इतके करूनही जवळपास तीन लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी राहिले होते. हे काम सोमवापर्यंत होणे अशक्यप्राय आहे, अशी कबुली विद्यापीठाकडूनच देण्यात आली होती.

लागता निकाल लागेना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात कुलगुरू संजय देशमुख यांच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून सर्वपक्षीय आमदारांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच निकाल वेळेवर लावण्यासाठीची मागणी विधान परिषदेत लावून धरली. त्यावेळी उत्तरपत्रिका तपासणीची माहिती आपण घेतली असून राज्यपालांनी दिलेल्या मुदतीतच निकाल जाहीर होतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले होते. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर न झल्यास विनोद तावडे यांच्याविरोधात आपण हक्कभंग मांडू, असा इशारा शिवसेनेने दिला होता.