एपी, सॅन फ्रान्सिस्को : अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याकडे शुक्रवारी ट्विटरची मालकी येण्याची शक्यता बळावली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरच्या जाहिरातदारांना उद्देशून केलेल्या ट्विटमधून याचे संकेत मिळाले असून न्यायालयाने दिलेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी ४४ अब्ज डॉलरचा हा व्यवहार पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
‘‘भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल चौक असणे आवश्यक आहे, त्यामुळेच मी ट्वीटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमे अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल,’’ असे ट्विट मस्क यांनी केले आहे. मस्क यांनी ट्विटरच्या व्यवहारातून काढता पाय घेतल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यावर डेल्वेअर चान्सरी न्यायालयाने त्यांना शुक्रवापर्यंत करार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसर २८ तारखेला हा व्यवहार पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मस्क यांनी आपले ट्विटर प्रोफाईल ‘चिफ ट्विट’ असे केले असून न्यूयॉर्क शेअर बाजारालाही शुक्रवारपासून ट्विटरच्या समभागांचे व्यवहार थांबवण्यास सूचित करण्यात आले आहे. त्यांनी बुधवारी ट्विटरच्या मुख्यालयाला भेटही दिली होती. या घटनांमुळे अखेर ट्विटर ही मस्क यांनी खासगी कंपनी होऊ घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
